अमेरिकेच्या गुप्तचर विभागाची गुपिते उघड करणाऱ्या एडवर्ड स्नोडेन याने रशियाचा आश्रय मागितला आह़े  त्यामुळे रशिया-अमेरिका संबंध अधिक ताणले गेले आहेत़  मात्र ‘स्नोडेन प्रकरणा’पेक्षाही मॉस्को- वॉशिंग्टन संबंध अधिक महत्त्वाचे असल्याचे वक्तव्य करीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी हे प्रकरण सौम्य करण्याचा प्रयत्न केला़
परंतु, त्याच वेळी स्वत:चे परराष्ट्र धोरण ठरविण्याचे स्वातंत्र्य रशियाला असल्याची आठवणही त्यांनी करून दिली़  स्नोडेनचे प्रत्यार्पण करण्यात यावे, अमेरिकेकडून पुन्हा एखादा आवाहन करण्यात आले आह़े पूर्व सायबेरिया प्रांतातील चिता येथे लष्करी सरावाची पाहाणी केल्यानंतर पुतिन यांची स्नोडेन प्रकरणावर भाष्य केल़े अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचा माजी कंत्राटदार स्नोडेन २३ जूनपासून मॉस्कोमधील विमानतळावर असल्याची माहिती आह़े स्नोडन विमानात असल्याच्या संशयावरून अनेक युरोपीय देशांनी काही दिवसांपूर्वी बोलिव्हियाच्या राष्ट्राध्यक्षांचे विमान उतरून देण्यास नकार दिला होता़  या घटनेच्या संदर्भात बोलताना, रशियाला स्वत:चे परराष्ट्र धोरण असून आम्ही असे वर्तन कधीही करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केल़े स्नोडेनने रशियाकडे आश्रय मागण्याला व्हाइट हाऊसकडून जोरदार विरोध करण्यात आला होता़  
चौकशीसाठी स्नोडेनने अमेरिकेत परतावे !
वॉशिंग्टन – अमेरिकेच्या हेरगिरीचा पर्दाफाश करून जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या एडवर्ड स्नोडेन याने आश्रय मिळावा यासाठी बुधवारी रशियाला साकडे घातले आहे. मात्र सध्या मॉस्को विमानतळावर आश्रय घेतलेल्या स्नोडेन याने अमेरिकेच्या कायद्याचे उल्लंघन केले असून या गुन्ह्य़ासाठी त्याने अमेरिकेत येऊन चौकशीला सामोरे जायला हवे आणि रशियानेदेखील त्याला अमेरिकेच्या ताब्यात द्यावे, असे व्हाइट हाऊसने बुधवारी स्पष्ट केले.
स्नोडेन याने अमेरिकेच्या गुप्त कार्यक्रमाची माहिती उघड करून गंभीर गुन्हा केला आहे. अमेरिकेच्या इतर नागरिकांप्रमाणे त्यालाही कायदेशीर चौकशीला सामोरे जाणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्याने आपल्या कृत्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी अमेरिकेत परत येणे आवश्यक असल्याचे व्हाइट हाऊसचे प्रसारमाध्यम सचिव जे कार्नी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
स्नोडेनला पुन्हा अमेरिकेत आणण्यासाठी रशियाशी बोलणी सुरू आहेत. कायदेशीर प्रक्रिया पार पाडणे हा उद्देश असल्याचे जे कार्नी यांनी म्हटले आहे.