– पीटीआय, न्यूयॉर्क

अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने (एसईसी) उद्याोगपती गौतम अदानी आणि सागर अदानी यांना लाचखोरीप्रकरणी समन्स बजावले आहे. भारतामधील काही राज्यांमध्ये सौर ऊर्जा कंत्राटे मिळवण्यासाठी २६५ दशलक्ष डॉलर (२,२०० कोटी रुपये) लाचेपोटी दिल्याचा अदानी यांच्यावर आरोप आहे.

गौतम अदानी यांच्या अहमदाबादमधील शांतीवन फार्म निवासस्थानी आणि सागर अदानी यांच्या अहमदाबादमधीलच बोडकदेव निवासस्थानी ही समन्स पाठवण्यात आली आहेत. ही नोटीस २१ नोव्हेंबरला बजावण्यात आली असून ‘एसईसी’ने दोघांनाही २१ दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे. अदानी यांच्यावर सौर ऊर्जा कंत्राटासाठी भारतातील काही राज्यांच्या अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा, त्यासाठी अमेरिकी गुंतवणूकदारांचे पैसे वापरण्याचा आणि अमेरिकी गुंतवणूकदारांच्या पैशांच्या व्यवहाराची माहिती तेथील यंत्रणेपासून लपवून ठेवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा – वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींनी मोडला राहुल गांधींचा रेकॉर्ड; प्रतिक्रिया देताना म्हणाले, “खूप अभिमान…”

‘न्यूयॉर्क ईस्टर्न डिस्ट्रिक्ट कोर्टा’ने अमेरिकेच्या दिवाणी कार्यवाहीच्या फेडरल नियमांच्या नियम १२ अंतर्गत हे समन्स बजावले आहे. ‘‘तुम्हाला हे समन्स बजावल्यापासून २१ दिवसांच्या आत तुम्ही फिर्यादीला उत्तर पाठवले पाहिजे,’’ असे त्यात नमूद करण्यात आले आहे. तसेच याला उत्तर दिले नाही तर कसूर केल्याचा निकाला दिला जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. सागर अदानी हे ‘अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड’चे संचालक आहेत.

हेही वाचा – विभाजनवादी राजकारणाचा पराभव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका; भाजप मुख्यालयात जल्लोष

अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाने गौतम अदानी, सागर अदानी यांच्यासह अन्य सहा जणांवर लाचखोरीचा आरोप ठेवला आहे. त्याच्या जोडीला ‘एसईसी’ने या अदानी काका-पुतण्यावर आणि अज्योर पॉवर ग्लोबलचे कार्यकारी अधिकारी सिरील कॅबेन्स यांच्यावर आरोप ठेवले आहे. अदानी समूहाने अमेरिकी फर्मसह अन्य गुंतवणूकदारांकडून कर्ज आणि रोख्यांच्या स्वरूपात दोन अब्ज डॉलर उभे केले. त्यासाठी त्यांनी या फर्मच्या लाचखोरीविरोधी धोरणांशी संबंधित खोटे व दिशाभूल करणारे विवरणपत्रे वापरली असाही त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र अदानी समूहाने हे आरोप फेटाळले आहेत.