विदेशी नागरिकांना भारतात आल्यानंतर इथल्या खाद्यपदार्थांची भुरळ पडते! सामान्य विदेशी नागरिकांप्रमाणेच सेलिब्रिटी, नेतेमंडळी आणि काही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनाही इथल्या खास पदार्थांचं अप्रूप वाटतं. पण चक्क दोन देशांच्या व्यापारविषयक संबंधांच्या वृद्धीसंदर्भात आता थेट भारतीय खाद्यपदार्थांचं उदाहरण दिलं जाऊ लागलं आहे. त्यामुळे भारतीय खाद्यपदार्थांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील किर्ती चर्चेचा विषय ठरली आहे. याला कारण ठरलं नुकतंच भारत व अमेरिकेतील द्वीपक्षीय चर्चेदरम्यान अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या सचिवांनी केलेलं एक विधान!
करोना काळ व त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील इतर घडामोडींमुळे भारत व अमेरिकेतील द्वीपक्षीय संबंध कायम चर्चेचा विषय राहिले. कधी मैत्रीपूर्ण, कधी नाराजीचे तर कधी तडजोडीचे सूर दोन्ही बाजूंनी उमटत राहिले. मात्र, दोन्ही देशांमधील संबंध पराकोटीचे ताणले मात्र कधीच गेलेले नाहीत. किंबहुना त्यात दिवसेंदिवस चांगल्या संबंधांच्या दिशेनं दमदार पावलंच पडताना दिसत आहेत. नुकतीच दोन्ही देशांमधील विदेशी व्यापार करारांच्या पार्श्वभूमीवर सचिव स्तरीय चर्चा पार पडली. यामध्ये अमेरिकेच्या ऊर्जा विभागाचे सचिन जॉफरे आर पियाट हे सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी द्वीपक्षीय संबंधांमध्ये होत असलेली सकारात्मक वाटचाल महत्त्वाची असल्याचं नमूद केलं.
पोळी नव्हे, पुरी!
यावेळी पियाट यांनी दोन्ही देशांमधील संबंध हे पोळीसारखे नसून पुरीसारखे असल्याचं उदाहरण दिलं! “आज कुणीही भारत व अमेरिका यांच्यातील संबंध पोळीसारखे सपाट आकाराचे असल्याचं सांगणार नाही. या संबंधांचा व्याप आता मोठा झाला आहे. ते आता एखाद्या पुरीसारखे फुगीर आणि आकाराने मोठे आहेत”, असं ते म्हणाले.
“आम्ही आत्ता भारताशी कोणत्याही स्वरूपाचा मुक्त व्यापार करार करत नसलो, तरी व्यापारविषयक संबंध वृद्धींगत करण्यासाठी काय करता येईल, यावर एक महत्त्वपूर्ण चर्चा दोन्ही बाजूंनी चालू आहे”, असं पियाट यांनी यावेळी सांगितलं.
अमेरिका, ब्रिटनचे हुतींच्या तळांवर हल्ले; आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीला लक्ष्य न करण्याचा इशारा
लाल समुद्रातील घडामोडींवर भाष्य!
काही दिवसांपूर्वी लाल समुद्रात येमेनी हुती बंडखोरांनी एका मालवाहून जहाजावर हल्ला केला होता. त्यासंदर्भात पियाट म्हणाले, “आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. जागतिक स्तरावर चालणारी सागरी वाहतूक, मालवाहू जहाजांचे बदलले जाणारे मार्ग यामुळे सरासरी महागाईवर किती परिणाम झाला? हुती बंडखोरांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या टँकर जहाजासाठी भारतीय नौदल मोक्याच्या क्षणी धावून गेलं होतं. यातून व्यापक भागात संरक्षण पुरवण्याचं भारताचं सामर्थ्यच अधोरेखित होतं. याचा अमेरिकेला अप्रत्यक्षपणे फायदाच झाला”, असंही पियाट यांनी नमूद केलं.