सध्या संपूर्ण जगाचे लक्ष मोदी सरकारकडे लागले असल्याचे चित्र आहे, यात अमेरिकादेखील मागे नाही. अमेरिकेलासुद्धा भारताबरोबरचे आपले संबंध आणखी दृढ करण्याची इच्छा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना अभिनंदनाचा दूरध्वनी केल्यानंतर आता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही देशांतील संबंध वृद्धिंगत करण्यावर यावेळी चर्चा झाल्याचे समजते. जॉन केरी यांनी ५०० दशलक्ष डॉलर्सचे वाणिज्य आणि व्यापाराचे लक्ष्य साधण्यावर लक्ष केंद्रित केले, तर सुषमा स्वराज यांनी आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्यावर भारत कसा भर देत आहे यावर भर दिला. त्याचबरोबर सुषमा स्वराज यांनी ‘सार्क’ देशांबरोबर झालेल्या चर्चेचा थोडक्यात आढावा दिला. बुधवारी रात्री उशिरा केरी यांनी सुषमा स्वराज यांना दूरध्वनी केला होता. सुषमा स्वराज यांना दूरध्वनी करणारे जॉन केरी हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पहिले नेते आहेत. सुषमा स्वराज आणि जॉन केरी एकमेकांना भेटण्यास उत्सुक असल्याचे प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. याआधी ओबामांनीदेखील मोदींशी झालेल्या दूरध्वनीवरील संभाषणात दोन्ही देशातील संबंध दृढ होतील आणि मोदींच्या कार्यकाळात भारत जागतिक पातळीवर महत्त्वाची भूमिका निभावेल, अशी आशा व्यक्त केली होती. ओबामा प्रशासनाने मोदींना अमेरिका भेटीचे निमंत्रणदेखील दिले आहे.

Story img Loader