भारत आणि अमेरिकेतील धोरणात्मक परिषद २४ जूनला दिल्लीत होत असून त्यानिमित्त अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी हे भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. उभय देशांतील ही चौथी परिषद आहे.
गेल्या वर्षी १३ जूनला उभय देशांतील तिसरी धोरणात्मक परिषद वॉशिंग्टन येथे झाली होती. त्या परिषदेत व्यापार, दहशतवादविरोधी लढा, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरणानुकूल ऊर्जानिर्मिती आणि आरोग्य; या क्षेत्रांबाबत व्यापक व सकारात्मक चर्चा झाली होती.
केरी यांच्या या दौऱ्याच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने अमेरिकेच्या परराष्ट्र राजकारणविषयक खात्याच्या उपमंत्री वेंडी शेरमन या भारतात दोन दिवसांसाठी आल्या आहेत. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन तसेच परराष्ट्र सचिव रंजन मथाई यांच्याशी केरी यांच्या दौऱ्याच्या आखणीबाबत चर्चा केली.
अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रीपदी केरी यांची फेब्रुवारीत नियुक्ती झाली आहे. परराष्ट्रमंत्री या नात्याने त्यांचा हा पहिला भारत दौरा आहे. नजिकच्या भविष्यात पंतप्रधान मनमोहन सिंग हेसुद्धा अमेरिकेच्या दौऱ्यावर येणार असून त्याबाबतही आम्ही उत्सुक आहोत, असे शेरमन यांनी नमूद केले.
ओबामा यांना साकडे
वॉशिंग्टन : दिल्लीत पुढील महिन्यात होत असलेल्या भारत-अमेरिका धोरणात्मक परिषदेच्या पाश्र्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतातील आर्थिक सुधारणांना वेग देण्यास आवश्यक ते पाठबळ द्यावे आणि त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हणून, ए-१बी व्हिसाबाबत भारतीय कंपन्यांच्या तक्रारींचे निवारण अग्रक्रमाने करावे, अशी मागणी अमेरिका भारत उद्योग मंडळाचे अध्यक्ष आणि मास्टर कार्ड वर्ल्डवाइडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय बंगा यांनी ओबामा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
भारताने आपल्या धोरणात उद्योगानुकूल वातावरण निर्माण होण्यासाठी आवश्यक ते बदल करावेत यासाठी आपण आणि आपल्या सहकारी मंत्र्यांनी प्रयत्न केला पाहिजे. तसे झाले तर भारतीय अर्थव्यवस्थेत अमेरिकी कंपन्यांचा विश्वासही वाढेल, असे मतही बंगा यांनी या पत्रात मांडले आहे.

Story img Loader