भारताविरोधात एफ-१६ फायटर जेटस विमानांचा वापर केल्या प्रकरणी अमेरिकेने पाकिस्ताकडून उत्तर मागितले आहे. पाकिस्तानने एफ-१६ विमानांचा वापर करुन अमेरिकेबरोबर केलेल्या कराराचे उल्लंघन केले आहे. भारताने बालकोटमधील दहशतवादी तळांवर कारवाई केल्यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून भारताच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पाकिस्तानने एफ-१६ या अत्याधुनिक फायटर विमानांचा वापर केला.
सर्तक असलेल्या भारतीय हवाई दलाने वेळीच त्यांचा हवाई हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला. भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना पिटाळून लावताना भारताने पाकिस्तानचे एक एफ-१६ विमान पाडले. पण पाकिस्तान हे मान्य करायला तयार नव्हता. अखेर गुरुवारी भारताने पाडलेल्या एफ-१६ विमानाचे अवशेष पत्रकार परिषदेत दाखवले. त्यामध्ये एफ-१६ मध्ये असलेल्या अॅमराम क्षेपणास्त्राचे भाग होते.
एफ-१६ चे अवशेष दाखवल्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा समोर आला. पाकिस्तानने एफ-१६ चा वापर केल्याच्या ज्या बातम्या येत आहेत त्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आम्ही त्यांच्याकडे यासंबंधी आणखी माहिती मागितली आहे असे अमेरिकेकडून सांगण्यात आले. गोपनीयतेच्या अटींमुळे याबद्दल जास्त काही सांगता येणार नाही असे अमेरिकन प्रशासनातील अधिकाऱ्याने सांगितले.
या प्रकरणात कुठल्याही निष्कर्षाप्रत येण्यासाठी काही गोष्टी सिद्ध झाल्या पाहिजेत. दहशतवादविरोधी लढाईत पाकिस्तानची क्षमता वाढवण्यासाठी त्यांना ही एफ-१६ विमाने दिली आहेत असे पेंटागॉनकडून सांगण्यात आले. अमेरिकेने पाकिस्तानला एफ-१६ फायटर विमाने दिली असली तरी त्याच्या वापरासंबंधी अनेक निर्बंधही घातले आहेत.