आंध्र प्रदेशातील टायटेनियम खनिजांच्या खाणींच्या उत्खननप्रकरणी १ कोटी ८५ लाख डॉलरची लाचखोरी करणारे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार के. व्ही. पी. रामचंद्र राव यांना अटक करावी, अशी मागणी अमेरिकेने केली आहे. राव हे खाणींच्या अवैध उत्खनन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कारस्थानात सहभागी असल्याचे अमेरिकी न्यायालयात सिद्ध झाल्यामुळे, ही मागणी करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या ‘नॅशनल क्राइम ब्यूरो’तर्फे इंटरपोलच्या मदतीने भारताच्या केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) या संदर्भातील पत्र पाठविण्यात आले. राजनैतिक मार्गानी संबंधित कागदपत्रे भारताच्या हाती सुपूर्द करेपर्यंत राव यांना तात्पुरत्या कैदेत टाकावे, अशी अपेक्षाही अमेरिकेकडून व्यक्त करण्यात आली आहे. अन्वेषण विभागानेही  प्रकरण आंध्र प्रदेश पोलिसांच्या हवाली केले असून राव यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करावी, अशा सूचना दिल्या आहेत. राव हे आंध्रचे दिवंगत मुख्यमंत्री वाय. एस. आर. रेड्डी यांचे निकटवर्तीय मानले जातात.
अन्य सहआरोपी
हंगेरी येथील उद्योजक अँद्रास नॉप (७५ वर्षे), युक्रेनचे सुरेन जेव्होरजिन (४० वर्षे), भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक गजेंद्र लाल (५० वर्षे) आणि श्रीलंकेचे पेरीयसामी सुंदरलिंगम् (६० वर्षे) यांना या प्रकरणी सहआरोपी करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशात खनीकर्मासाठी परवाने मिळविण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
प्रकरण नेमके काय?
आंध्र प्रदेशातील टायटेनियम खनिजाच्या उत्खननास परवानगी मिळावी, यासाठी भारताच्या केंद्र आणि राज्य सरकारमधील अधिकाऱ्यांना लाच देण्यास राव यांनी उत्तेजन दिले. १ कोटी ८५ लाख डॉलरचे हे लाच प्रकरण हा आंतरराष्ट्रीय नियोजित कारस्थानाचा एक भाग होता आणि ६५ वर्षीय राव यांच्यासह ५ जणांविरोधात अमेरिकी न्यायालयात हा गुन्हा सिद्ध झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा