रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची हत्या केली पाहिजे, असं वक्तव्य यूएस सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी केलंय. रशियाच्या लोकांनीच या दहशतवादाचा अंत करावा, असे आवाहन ग्रॅहम यांनी केले. ते म्हणाले, “मला आशा आहे की पुतिन यांना एके दिवशी नक्की अध्यक्षपदावरून हटवलं जाईल, त्यांना कसं हटवणार, याची मला पर्वा नाही. त्यांनी त्या पदावरून जावे, अशी माझी इच्छा आहे,” असं लिंडसे ग्रॅहम पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्या; युरोपियन नेत्यांची मागणी
“व्लादिमीर पुतिन हे कायद्याचं पालन करणारे नेते नाहीत. ते वॉर क्रिमिनल आहे. पुतिन यांची हत्या करण्यासाठी अमेरिकेच्या सैन्याने रशिया किंवा युक्रेनमध्ये हस्तक्षेप करू नये, तर रशियन लोकांनीच पुतिन यांची हत्या करायला हवी, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली.
“मी त्यांना बाहेर काढण्यासाठी रशियावर आक्रमण करण्यास सांगत नाही. मी रशियन सैन्याशी लढण्यासाठी युक्रेनमध्ये अमेरिकन भूदल पाठवण्यास सांगत नाही. मी रशियन लोकांना हे दहशतीचे साम्राज्य संपवण्यास सांगत आहे,” असं ग्रॅहम म्हणाले. यापूर्वीही या महिन्याच्या सुरुवातीला ग्रॅहम यांनी पुतिन यांची हत्या करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर रशियासह त्यांच्या पक्षाकडूनही त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.