एपी, तैपेई : चीनचा तीव्र विरोध सुरू असतानाही अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांनी बुधवारी तैवानचा दौरा पूर्ण केला. पलोसी यांच्यासह पाच अमेरिकन लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ तैवानहून दक्षिण कोरियाला रवाना झाले. पलोसी आपल्या आशिया दौऱ्यात सिंगापूर, मलेशिया आणि जपानलाही भेट देणार आहेत.
तत्पूर्वी, तैवान भेटीदरम्यान या शिष्टमंडळाने अमेरिका तैवानबाबत वचनबद्ध असून, मागे हटणार नसल्याची ग्वाही दिली. पलोसी या २५ वर्षांत तैवानला भेट देणाऱ्या अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाच्या पहिल्या अध्यक्ष आहेत. तैवानचे राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांची भेट घेतल्यानंतर एका संक्षिप्त निवेदनात नमूद करण्यात आले, की आज जगासमोर लोकशाही आणि निरंकुशतेपैकी एक पर्याय निवडण्याचे आव्हान आहे. तैवान आणि जगभरातील लोकशाहीवादी देशांच्या रक्षणाबाबत अमेरिका कटिबद्ध आहे.
चीनच्या दाव्यानुसार, तैवान हा चीनचा प्रदेश असल्याने विदेशी सरकारांनी तैवानशी केलेल्या थेट चर्चेला चीनचा विरोध आहे. चीनने मंगळवारी रात्री अमेरिकी शिष्टमंडळाला तैवान दौरा न करण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्यानंतर पलोसी व शिष्टमंडळाचा तैवान दौरा झाला. त्यानंतर चीनने तैवानच्या चहू दिशांनी परिसरात लष्करी सराव सुरू केला. अमेरिकेस कठोर भाषेत दुष्परिणामांचा इशारा दिला.
चीनचा अमेरिकेला इशारा
दरम्यान, चीनचे उप परराष्ट्रमंत्री शी फेंग यांनी मंगळवारी उशिरा चीनमधील अमेरिकेचे राजदूत निकोलस बर्न्स यांना बोलावून पलोसी यांच्या तैवान भेटीला तीव्र विरोध दर्शवला. चीनची सरकारी वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’च्या वृत्तानुसार, शी फेंग यांनी सांगितले, की चीनच्या निषेधाला न जुमानता पलोसींनी तैवानला भेट दिली. या चुकींची किंमत अमेरिकेला चुकवावी लागेल. शी फेंग यांनी अमेरिकेला ताबडतोब याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगून पलोसी यांच्या तैवान भेटीने होणारे संभाव्य प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले. तैवानच्या सामुद्रधुनीत तणाव वाढून चीन-अमेरिका संबंध विकोपाला जाऊ नये म्हणून असे चुकीचे मार्ग अमेरिकेने टाळावेत, असा सल्लाही चीनने दिला.