गुप्तहेरी कारवायांसाठी प्रसिद्ध असणारी ‘सीआयए’ (सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी) या अमेरिकन संघटनेचा ट्विटर आणि फेसबुक या सोशल माध्यमांवरील प्रवेश चांगलाच गाजला. ‘सीआयए’ संघटनेचे ट्विटर आणि फेसबुकवरील पेज सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासांत या पेजला विक्रमी हिटस् मिळाले. ‘सीआयए’च्या ट्विटर अकाऊंटच्या फॉलोअर्सची संख्या नऊ तासांच्या कालावधीत २,६८,००० वर जाऊन पोहचली. त्यानंतर पहिल्यांदाच ट्विट करताना ‘सीआयए’ने ‘हे आमचे पहिलेवहिले ट्विट असून, या गोष्टीला आम्ही दुजोरा देत नाही आणि नाकारत ही नाही’ असे सांगितले. या ट्विटलासुद्धा नेट युजर्सनी प्रचंड प्रतिसाद दिला.
We can neither confirm nor deny that this is our first tweet.
— CIA (@CIA) June 6, 2014
तसेच शुक्रवारी दिवस संपताना ‘सीआयए’च्या फेसबुक पेजलासुद्धा ७,३०० लाईकस मिळाले होते. गेल्या काही दिवसांतील सोशल माध्यमांवर गुप्तपणे नजर ठेवण्याच्या मुद्द्यावरून अमेरिकन सरकारवर अनेकांनी टीका केली होती. सरकारने नागरिकांच्या खासगी जीवनात अशाप्रकारे ढवळाढवळ करणे अनेकांना रुचले नव्हते. त्यामुळे ‘सीआयए’चा फेसबुक आणि ट्विटरवरील प्रवेशावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळाल्या.
याविषयी बोलताना ‘सीआयए‘चे प्रमुख जॉन ब्रेनान म्हणाले, की नागरिकांशी संपर्क साधता यावा, यासाठी आम्ही या सोशल नेटवर्किंगसाईट्सवर येण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सीआयए‘च्या विविध मिशनमध्ये काही घडामोडी जाणून घेण्यासाठी आम्हाला याचा फायदा होणार आहे. या पेजवर ‘सीआयए‘ बद्दलही वेगवेगळी माहिती अपलोड करण्यात येणार आहे.