Tulsi Gabbard Statement: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे भ्याड दहशतवादी हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना शोधून त्यांना कठोर असे शासन करू, तसेच त्यांच्या पाठिराख्यांनाही शोधून त्यांना कल्पनेपलीकडची शिक्षा देऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर आता अमेरिकेनेही मोठी घोषणा केली आहे. अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पहलगाम येथे इस्लामिक दहशतवादी हल्ला झाल्याचे म्हटले.
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संस्थेच्या संलाचक तुलसी गॅबार्ड म्हणाल्या, “पहलगाममध्ये २६ हिंदूंना लक्ष्य करत ठार केले गेले. या भयानक इस्लामी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही भारताच्या मागे खंबीरपणे उभे आहोत. या हल्ल्यात ज्यांनी आपले प्रियजन गमावले ते सर्व लोक आणि भारताप्रती मी प्रार्थना करून सहानुभूती व्यक्त करते.”
तुलसी गॅबार्ड पुढे म्हणाल्या, “या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना शोधण्यात आम्ही भारताला सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार आहोत.”
विशेष म्हणजे तुलसी गॅबार्ड यांनी पोस्ट करण्यासाठी जी वेळ साधली तीही महत्त्वाची ठरत आहे. आजच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांच्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानी पत्रकाराने पहलगाम हल्ल्याबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र टॅमी ब्रूस यांनी त्याला प्रश्न विचारू दिला नाही. टॅमी ब्रूस यांच्या भूमिकेनंतर काही तासातच तुलसी गॅबार्ड यांची पोस्ट समोर आली आहे.
याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत भारताला अमेरिकेचा पाठिंबा दर्शविला होता.
अमेरिकेच्या सांगण्यावरून दहशतवाद पोसला
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची राजनैतिक कोंडी करत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे खवळलेल्या पाकिस्तानकडून आता भारताविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे कबूल केले. मात्र हा दहशतवाद अमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या सांगण्यावरून पोसण्यात आला होता, असे ते म्हणाले. सुमारे तीन दशके हे घाणेरडे कृत्य आम्ही केले होते, त्याबद्दल वाईट वाटते, असेही ते म्हणाले.