तालिबान्यांशी सुरू करण्यात आलेली चर्चेची प्रक्रिया ‘निर्विघ्न’पणे पार पडावी यासाठी अमेरिकेने आपले ड्रोन हल्ले थांबवावेत, अशी विनंती पाकिस्तानने केली होती. त्या विनंतीस प्रतिसाद देत अमेरिकेने तालिबान्यांवरील ड्रोन हल्ले कमी केले आहेत. ‘पाकिस्तानच्या विनंतीस नकार देणे आम्हाला प्रशस्त वाटले नाही, आणि आम्ही हल्ले कमी करण्याचा निर्णय घेतला’, असे अमेरिकेच्या संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानी तालिबान्यांच्या प्रमुख दहशतवादी केंद्रांवर हल्ले करणे शक्य असल्यास, अशा केंद्रांना निष्क्रिय करण्याची संधी अमेरिका दवडणार नाही, असे नमूद करण्यास मात्र हे अधिकारी विसरले नाहीत. २०११ पासून अमेरिकेने पाकिस्तानी तालिबान्यांविरोधातील मोहीम तीव्र केली होती.
तालिबान्यांच्या अनेक तळांवर तसेच प्रशिक्षण केंद्रांवर सीआयएने अविरत ड्रोन हल्ले सुरू ठेवले होते. मात्र, डिसेंबर २०१३ पासून गेले सहा आठवडे हे हल्ले थांबविले आहेत.
याबाबत स्पष्टीकरण देताना, पाकिस्तानी सरकारने तालिबान्यांशी शांतता चर्चा सुरू केली असून त्या चर्चेत या हल्ल्यांमुळे व्यत्यय येत असल्याची पाकिस्तानची तक्रार होती. त्यामुळे हे हल्ले थांबवावेत अशी कळकळीची विनंती शरीफ सरकारतर्फे आम्हाला करण्यात आली होती. त्या विनंतीस सकारात्मक प्रतिसाद द्यायचा निर्णय आम्ही घेतला, असे ओबामा प्रशासनाने म्हटले आहे.
हकिमुल्ला मेहसूद ड्रोन हल्ल्यात ठार झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र असे असले तरीही तालिबान्यांशी चर्चा करायची की नाही हा पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न असल्याचेही अमेरिकेने सांगितले आहे.
दरम्यान, पाकिस्तान सरकारच्या पुढाकाराने तालिबान्यांशी सुरू करण्यात आलेली शांतता चर्चेची पहिली फेरी मंगळवारी रात्री पुढे ढकलण्यात आली. सरकारतर्फे वाटाघाटी करणाऱ्यांवर ‘दबाव’ असल्याचे कारण तालिबानी प्रतिनिधींनी चर्चा थांबविताना पुढे केले आहे.

Story img Loader