US top court rejects 26/11 accused Tahawwur Rana’s plea : २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती तहव्वुर राणा याला अमेरिकन कोर्टने मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची त्याची विनंती फेटाळून लावली आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राणाला भारतात परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

२७ फेब्रुवारी रोजी, राणा याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सहयोगी न्यायाधीश आणि नवव्या सर्किटच्या न्यायाधीश एलेना कागन यांच्यासमोर खटल्याच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यासाठी आपत्कालीन अर्ज दाखल केला होता. परंतु, कागन यांनी राणाचा अर्ज फेटाळला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर ६ मार्च रोजी प्रकाशित झालेल्या एका पत्रात नमूद केले. यानंतर, राणाने पुन्हा आपत्कालीन अर्ज केला आणि तो मुख्य न्यायाधीश रॉबर्ट्स यांना पाठविण्याची विनंती केली.

सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की हा नूतनीकरण केलेला अर्ज ४ एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीसाठी वितरित करण्यात आला होता आणि विचारार्थ न्यायालयात पाठवण्यात आला होता. सोमवारी, सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर “न्यायालयाने अर्ज नाकारला” अशी सूचना पोस्ट करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारत आग्रही आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये भारताने त्याच्या अटकेसाठी वॉरंट जारी केले होते.

फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तेव्हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यात प्रत्यार्पणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाली होती. याबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते, “मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की माझ्या प्रशासनाने २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील कट रचणाऱ्यांपैकी एक आणि जगातील अत्यंत दुष्ट व्यक्तींपैकी एकाचे (तहव्वुर राणा) भारतातील प्रत्यार्पणाला मान्यता दिली आहे.” तर, प्रत्यार्पणाला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांचे आभार मानले आणि “सीमापार दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईची आवश्यकता आहे” असे प्रतिपादन केले.

तहव्वूर राणा कोण?

राणा हा पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीशी संबंधित आहे. त्याला दाऊद गिलानी म्हणूनही ओळखले जाते. तो या हल्ल्यांमधील एक प्रमुख व्यक्ती होता. त्याच्यावर हेडली आणि पाकिस्तानमधील इतरांना मुंबई दहशतवादी हल्ल्यात लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. पण, राणाचा असा दावा आहे की त्याला हेडलीच्या दहशतवादी कटाची माहिती नव्हती आणि तो फक्त त्याचा बालपणीचा मित्र हेडलीला मदत करण्याचा आणि मुंबईत व्यवसाय कार्यालय स्थापन करण्याचा प्रयत्न करत होता.