गेल्यावर्षी सहा नराधमांनी केलेल्या पाशवी सामुहिक बलात्कारामुळे प्राणाला मुकलेल्या दिल्लीतील त्या पीडित मुलीचा म्हणजेच निर्भयाचा मरणोत्तर ‘इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज’ पुरस्काराने सन्मान करण्याचा निर्णय अमेरिकेने सोमवारी जाहीर केला. जगातील दहा कर्तृत्ववान महिलांना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा आणि परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांच्या हस्ते येत्या आठ मार्चला निर्भयाच्या नातेवाईकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. महिलांवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय स्तरावर आवाज उठविण्यात निर्भयाच्या मृत्यूने, तिच्या कुटुंबियांच्या लढ्याने बळ मिळाले असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना निर्भयाने आपल्यावर अत्याचार करणाऱया सहा नराधमांविरुद्ध जबानी दिली होती. न्याय मिळाल्याचे आपल्याला पाहायचे असल्याचे तिने पोलिसांना सांगितले होते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिने दिलेल्या लढ्यामुळे अनेक भारतीयांना प्रेरणा मिळाली. सामान्य नोकरदार कुटुंबामध्ये तिने जन्म घेतला. तिला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असल्याने तिच्या कुटुंबियांनी आपली संपूर्ण बचत तिच्या शिक्षणासाठी वापरली, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.
तिच्या मृत्यूनंतर भारत सरकारने महिलांवरील अत्याचाराविरोधात कडक पावले उचलण्यास सुरूवात केली असल्याचेही निवेदनात लिहिले आहे.

Story img Loader