नेहमी आपण प्रगत देशांकडून तंत्रज्ञान घेतो पण आता अमेरिकेने भारताकडून बॉम्बशोधक संच तयार करण्याचे तंत्र घेतले असून या संचाचे उत्पादन व वितरणही अमेरिका करणार आहे. हा बॉम्बशोधक संच भारतीय वैज्ञानिकांनी तयार केला असून त्याचे उत्पादन करून अमेरिका तो बॉम्बशोधासाठी जगभर विक्रीस उपलब्ध करणार आहे. भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वैज्ञानिकांनी तो तयार केला आहे.
वॉशिंग्टन येथे  व्हाइट हाऊसपासून थोडय़ाच अंतरावर दूर असलेल्या यूएस चेंबर ऑफ कॉमर्स बिल्डिंग येथे भारताने विकसित केलेल्या व अमेरिकेने उत्पादित केलेल्या बॉम्बशोधक संचाचे अनावरण करण्यात आले. संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे तंत्रज्ञान अमेरिकेकडून वापरले जाण्याची बहुदा ही पहिलीच वेळ आहे.
अमेरिकेचे संरक्षण सचिव विल्यम एस. कोहेन यांनी सांगितले की, तंत्रज्ञान हस्तांतर द्विमार्गी असते. डीआरडीओने तयार केलेले हे तंत्रज्ञान अमेरिकेला मिळणे हा  विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे होणाऱ्या हस्तांतराचा उत्तम नमुना आहे.
डीआरडीओ-फिक्की यांच्या संयुक्त तंत्रज्ञान व्यावसायिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत दोन्ही देशात करार झाला होता अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या क्रो अँड कंपनीला बॉम्बशोधक संचाच्या उत्पादनाचा परवाना देण्यात आला होता. अमेरिकेतील राजदूत निरुपमा राव यांनी सांगितले की, भारत-अमेरिका यांच्यातील धोरणात्मक भागीदारातील हा एक मैलाचा दगड आहे. भारतीय संरक्षण संशोधन संस्था या जागतिक दर्जाचे काम करीत आहेत व जगाच्या समस्यांवर तोडगे काढीत आहेत हेच यातून स्पष्ट होते.
पुण्यात निर्मिती
पुण्याच्या उच्च ऊर्जा पदार्थ संशोधन प्रयोगशाळा (हाय एनर्जी मटेरियल रीसर्च लॅबोरेटरी) या डीआरडीओच्या अंतर्गत असलेल्या प्रयोगशाळेने स्फोटके व बॉम्ब शोधणारा हा संच तयार केला असून त्यात नायट्रो-इस्टर्स, नायट्रामाइन्स, ट्रायनायट्रोल्यून, डायनामाईट, ब्लॅक पावडर अशा स्फोटक पदार्थाचा वापर असलेल्या बॉम्बचा शोध घेता येतो. आयईडी म्हणजे प्रगत स्फोटकातील विविध स्फोटकांचे मिश्रण नेमके काय आहे हे ओळखण्याची क्षमता या संचात आहे. आरडीएक्समधील प्लास्टिक स्फोटके बहुतेक सर्व इलेक्ट्रॉनिक शोधकांच्या मदतीने ओळखता येत नाहीत पण डीआरडीओच्या प्रयोगशाळेने तयार केलेल्या या स्फोटक शोध संचाने प्लास्टिक स्फोटकांचाही शोध घेता येतो. नेहमीच्या वातावरणात दोन ते तीन मिनिटात स्फोटकांची चाचणी करता येते.
उपयोग काय ?
हा बॉम्बशोधक व तपासणी संच कुठेही नेता येतो, तो किफायतशीर आहे व त्याचा वापर बॉम्बस्फोटाआधी व नंतरच्या परिस्थितीत लष्कर, निमलष्करी दले व पोलीस यांची बॉम्बशोधक व नाशक पथके करू शकतात.

Story img Loader