Donald Trump : गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. या निर्णयांमध्ये अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्धचा मुद्दा असेल किंवा नवीन टॅरिफ धोरण (आयात शुल्क) या संदर्भातील निर्णयासह अनेक मोठे निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक निर्णयांचा फटका जगातील देशांना बसला आहे. यातच आता ट्रम्प हे आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
जगभरातील तब्बल ४१ देशांना अमेरिकेत प्रवेश बंदी अर्थात प्रवासावर निर्बंध लादण्यात येण्याची शक्यता आहे. या संदर्भातील निर्णयाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रशासन सध्या हालचाली करत असल्याची माहिती समोर येत आहे. न्यू यॉर्क टाईम्सच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. एवढंच नाही तर या प्रवेश बंदीचे तीन श्रेणीत विभाग करण्यात आले आहेत. यामध्ये रेड, ऑरेंज आणि येलो अशा प्रकारचे झोन देखील करण्यात येणार आहेत.
अमेरिकन सरकारने याबाबतचा एक मसुदा तयार केला आहे. यामध्ये पाकिस्तानसह ४१ देशांना अमेरिकेत प्रवासबंदी करण्यात येणार आहे. हा प्रस्तावित मसुदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात लागू केलेल्या प्रवास निर्बंधांपेक्षा जास्त व्यापक असणार आहे, अशी माहिती सांगितली जात आहे.
व्हिसा जारी करण्यावर अंशतः बंदीचा प्रस्ताव
बेलारूस, इरिट्रिया, हैती, लाओस, म्यानमार, पाकिस्तान, रशिया, सिएरा लिओन, दक्षिण सुदान आणि तुर्कमेनिस्तान या देशांच्या नागरिकांना प्रवास प्रतिबंधित असेल. परंतु पूर्णपणे बंद केला जाणार नाही. या देशांवर काही अटींसह बंदीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. दरम्यान, पाकिस्तान, भूतान आणि म्यानमारसह २६ देशांच्या सरकारांनी ६० दिवसांच्या आत त्रुटी दूर करण्यासाठी पावले उचलली नाहीत तर त्यांना अमेरिकन व्हिसा जारी करण्यावर अंशतः बंदी घालण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने सांगितली जात आहे.
दरम्यान, अमेरिकेने पाकिस्तानला २६ देशांच्या यादीत ठेवलं आहे. पाकिस्तानसह या २६ देशांना व्हिसा जारी करण्यावर अंशत: बंदीचा सामना करावा लागू शकतो. पण जर या २६ देशांतील मग पाकिस्तानसह ज्या त्या सरकारने जर सुरक्षा नियमांमधील उणिवा ६० दिवसांत दूर केल्या तर यामधून सूट दिली जाऊ शकते असंही म्हटलं जात आहे.
पूर्ण व्हिसा निलंबन
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने ४१ देशांच्या ३ याद्या तयार केल्या आहेत. यातील पहिल्या रेड यादीत १० देशांचा समावेश आहे. यात अफगाणिस्तान, भूतान, क्युबा, इराण, लिबिया, उत्तर कोरिया, सोमालिया, सुदान, सीरिया, व्हेनेझुएला या देशांचा असेल. या देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
पाकिस्तानवर काय परिणाम होईल?
अमेरिकेने अशा प्रकारे प्रतिबंध घातल्यास याचा परिणाम पाकिस्तानवर वेगवेगळ्या स्थरावर होण्याची शक्यता आहे. यामध्ये शिक्षण, व्यवसायासह अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्यांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर पाकिस्तानी लोकांना अमेरिकेत काम करण्याची संधी कमी होण्याची शक्यता आहे.