वृत्तसंस्था, वॉशिंग्टन, बगदाद
अमेरिका, ब्रिटन आणि इतर सहकारी देशांनी शनिवारी येमेनमधील हुतींच्या नियंत्रणाखालील भागावर अतिरिक्त हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा हुतींनी रविवारी दिला. अमेरिकेने शनिवारी एक निवेदन प्रसिद्ध करून हुतींवर केलेल्या हल्ल्याची माहिती दिली.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी माहिती दिली की, येमेनमधील १३ तळांवर हुतींच्या एकूण ३६ लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला. या तळांवर हुतींनी लपवून ठेवलेल्या शस्त्र साठवणुकीच्या जागा, क्षेपणास्त्र यंत्रणा व लाँचर, हवाई बचाव यंत्रणा आणि रडार अशा आधुनिक सामग्री असल्याचे या ऑस्टिन यांनी सांगितले. या हल्ल्यांमध्ये अमेरिका व ब्रिटनला ऑस्ट्रेलिया, बहारिन, कॅनडा, डेन्मार्क, नेदरलँड्स व न्यूझीलंड हे देशही सहभागी झाले.
हेही वाचा >>>भारतीय दूतावासातील कर्मचारी सत्येंद्र सिवल हनी ट्रॅपच्या जाळ्यात; पाकिस्तानला पुरविली गुप्त माहिती
हुती बंडखोरांनी नोव्हेंबर २०२३पासून लाल समुद्र, अरबी समुद्र आणि एडनचे आखात या भागांमध्ये मालवाहतूक करणारी जहाजे तसेच लष्करी जहाजांना लक्ष्य केले आहे. त्यांची क्षमता कमी करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन व अन्य देशांनी संयुक्तपणे ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
हुतींची प्रत्युत्तराचा इशारा
दरम्यान, अमेरिका व ब्रिटनच्या लष्करांनी ३६ ठिकाणी केलेल्या हल्ल्याला उत्तर दिले जाईल असा इशारा हुती बंडखोरांनी दिली आहे. तसेच या हल्ल्यांमुळे पॅलेस्टानला असणारा पाठिंबा कमी होणार नाही असे हुतींकडून सांगण्यात आले.