JD Vance first official visit to India : अमेरिकेने जगभरातील अनेक राष्ट्रांवर आयात शुल्क लावलं आहे. या आयात शुल्कामुळे अमेरिकेचा अनेक देशांशी संघर्ष चालू असून अमेरिकेने चीनबरोबर उघड व्यापार युद्ध सुरू केलं आहे. गेल्या दोन तीन आठवड्यांमध्ये अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लागू केलेलं आयात शुल्क तब्बल आठ पटीने वाढवलं आहे. तर, चीनने डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या रेसिप्रोकल टॅरिफला (परस्पर आयात शुल्क) प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेवर १४५ टक्के आयात कर लागू केलं आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने चीनवरील आयात शुल्क आणखी वाढवलं.

व्हाइट हाऊसने जारी केलेल्या नव्या परिपत्रकानुसार आता चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या उत्पादनांवर तब्बल २४५ टक्के व्यापार कर लागू असेल. तर, अमेरिकेने भारतावर २७ टक्के आयात शुल्क लावलं आहे. मात्र, याची अंमलबजावणी तात्पुरती पुढे ढकलली आहे.

जे. डी. व्हॅन्स व नरेंद्र मोदी भारत व अमेरिकेतील द्विपक्षीय व्यापार करारांना अंतिम स्वरूप देणार

जगभर टॅरिफ वॉरचे मळभ दाटलेले असताना अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स हे चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. व्हॅन्स हे पत्नी उषा व मुलांसह काही वेळापूर्वी पालम विमानतळावर उतरले. व्हॅन्स यांच्या भारत दौऱ्याकडे अनेक देशाचं लक्ष लागलं आहे. या दौऱ्यात अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमधील संबंध बळकट करणे, द्विपक्षीय व्यापार वाढवणे, द्विपक्षीय व्यापार करारांना अंतिम स्वरूप देणे आदी महत्वाच्या विषयांवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेडी व्हॅन्स यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

जे. डी. व्हॅन्स सहकुटुंब भारत भेटीवर

अमेरिकेचे उपाध्यक्ष म्हणून जे. डी. व्हॅन्स हे पहिल्यांदाच भारताच्या अधिकृत भेटीवर आले आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी तथा अमेरिकेची सेकेंड लेडी उषा व्हॅन्स आणि त्यांची तीन मुलं, इवान, विवेक आणि मिराबेल देखील आले आहेत. तसेच अमेरिकेच्या प्रशासनातील काही अधिकारी देखील या दौऱ्यात सहभागी आहेत. सकाळी सव्वादहाच्या सुमारास त्यांचं विमान दिल्लीतल्या पालम एअरबेसवर व्हॅन्स यांचं विमान उतरलं. व्हॅन्स हे नुकतेच इटलीला गेले होते. इटली दौरा आटपून ते आता भारतात दाखल झाले आहेत. संध्याकाळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. व्हॅन्स यांच्या या भारत भेटीतून दोन्ही देशांना काय लाभ होणार हे पुढील दोन तीन दिवसांत स्पष्ट होईल.