US Joins with Russia Against Ukrain in UN: रशियानं युक्रेनमध्ये सैन्य घुसवून कारवाई करण्यास नुकतीच तीन वर्षं पूर्ण झाली. यादरम्यान, युक्रेननं जगभरातील देशांना पाठिंब्यासाठी आवाहन केलं. अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांकडे मदतीची याचना केली. खुद्द अमेरिकेशीही बोलणी केली. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून युरोपियन युनियनसह रशियाच्या आगळिकीविरोधात मतदान करणाऱ्या अमेरिकेने यंदा चक्क रशियाशीच हातमिळवणी केल्याचं संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाहायला मिळालं. सोमवारी महासभेच्या बैठकीत युक्रेनकडून मांडण्यात आलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पण यावेळी अमेरिकेनं रशियासह प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समर्थन व विरोधात कुणाचं मतदान?

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत सोमवारी युक्रेननं रशियाच्या घुसखोरीविरोधात प्रस्ताव मांडला. रशियानं तातडीनं आपलं सैन्य माघारी घ्यावं, ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करावी आणि युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धावर शांततापूर्ण मार्ग काढला जावा, अशी मागणी या प्रस्तावात करण्यात आली होती. महासभेत हा प्रस्ताव बहुमतानं मंजूर करण्यात आला. यावेळी काही सदस्य राष्ट्रांनी विरोधात मतदान केलं तर काही सदस्य राष्ट्रे मतदान प्रक्रियेसाठी गैरहजर राहिली.

प्रस्तावावरील मतदानाच्या अंतिम आकडेवारीनुसार, ९३ देशांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं. त्यात जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स व अमेरिका वगळता इतर जी-७ राष्ट्रांचा समावेश होता. एकूण १८ देशांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं. त्यात रशिया, अमेरिका, इस्रायल व हंगेरी या देशांचा समावेश आहे. तर तब्बल ६५ देशांनी मतदानासाठी गैरहजर राहण्याचा मार्ग स्वीकारला.

भारताची भूमिका काय?

रशिया व युक्रेन या दोन्ही देशांशी भारताचे सौहार्दाचे संबंध राहिले आहेत. गेल्या तीन वर्षांत वेळोवेळी विचारणा झाल्यानंतर भारतानं दोन्ही बाजूंना समतोल साधणारी भूमिका मांडल्याचं दिसून आलं. त्याचंच प्रतिबिंब सोमवारच्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेतील मतदान प्रक्रियेत पाहायला मिळालं. भारतानं यावेळी कुणाच्याही बाजूने मतदान करण्याऐवजी मतदान प्रक्रियेला गैरहजर राहण्याचा मार्ग निवडला. भारतासह एकूण ६५ देश या मतदानावेळी गैरहजर होते. यामध्ये ब्राझील, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, यूएई, कतार, इराण, इराक, ओमन, कुवैत, सीरिया, इथिओपिया, अर्जेंटिना या देशांचा समावेश होता. त्याशिवाय पाकिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंका ही भारताची शेजारी राष्ट्रेही गैरहजर होती. भूटान, नेपाळ, मालदीव व म्यानमार या शेजारी देशांनी मात्र प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं आहे.

याआधीच्या सभेत जवळपास १४० सदस्यांनी युक्रेनच्या बाजूने व रशियाच्या विरोधात मतदान केलं होतं. पण एकूण मतदानाची आकडेवारीच आता खाली येऊ लागल्यामुळे युक्रेनला असणारा पाठिंबा जागतिक स्तरावर कमी होऊ लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

पहिल्यांदाच बदलली अमेरिकेची भूमिका

गेल्या तीन वर्षांत रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेनं कायम युरोपियन राष्ट्रांसह रशियाच्या विरोधातच मतदान केल्याचं पाहायला मिळालं. यंदा मात्र अमेरिकेनं चक्क रशियाच्या बाजूने मतदान केलं. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं सत्तेवर येणं रशियाच्या पथ्यावर पडल्याचं प्राथमिक चित्र संयुक्त राष्ट्राच्या महासभेत युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर दिसून येत आहे.