वृत्तसंस्था, वॉशिंग्टन : रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या अनुषंगाने अमेरिकेने चीनला पुन्हा एकदा निर्बंधांचा इशारा देण्याबरोबरच भारताचे रशियावरील शस्त्र अवलंबित्व संपवण्यासाठी मदतीची ग्वाही गुरुवारी दिली. चीनने कोणत्याही स्वरूपात रशियाला युद्धात मदत केल्यास त्या देशावर आणखी आर्थिक निर्बंध लादण्यात येतील, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. तसेच भारताचे रशियावरील शस्त्रास्त्र अवलंबित्व संपविण्यासाठी मदत करण्यात येईल, असे अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्री विन्डी शर्मन म्हणाल्या.
युक्रेनमधील परिस्थिती सुधारावी यासाठी चीन काहीही करताना आढळत नाही, असा आरोप शर्मन यांनी गुरुवारी ब्रुसेल्स येथे एका कार्यक्रमात केला. चीन रशिया युद्धातून योग्य ते धडे घेईल. तसेच चीन अमेरिकेला मित्रराष्ट्रांपासून तोडू शकत नाही, असेही शर्मन म्हणाल्या. जागतिक निर्बंधांमुळे रशियाच्या शस्त्रास्त्र उद्योगावर होणारा परिणाम पाहता, त्या देशावरील भारताचे पारंपरिक अवलंबित्व संपुष्टात आणण्यासाठी अमेरिका सहकार्य करेल, अशी ग्वाही शर्मन यांनी दिली.