गेल्या तीन आठवड्यांपासून इस्रायल व हमास यांच्यात चालू असणारं युद्ध अद्याप थांबण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. आधी हमासनं इस्रायलच्या भूमीवर रॉकेट हल्ला चढवल्यानंतर इस्रायलनंही गाझा पट्टीतील हमासच्या तळांवर तुफान हवाई हल्ला चढवला. आत्तापर्यंत या युद्धात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला असून आकडा वाढत असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायल-हमास युद्ध आणखी विस्तारण्याची भीषण शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायल व पॅलेस्टाईनला समर्थन देणारी राष्ट्रे एकमेकांसमोर उभी ठाकण्याची शक्यता दिसू लागली आहे. त्यात अमेरिका व इराण यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं इराणला जाहीरपणे इशारा दिला आहे.
नेमकं काय घडतंय?
इस्रायल व हमासमधील युद्ध अद्याप चालूच असून हमासचे दहशतवादी माघार घेण्यास तयार नाहीत. यूएनकडून पुरवण्यात येणारी जीवनावश्यक सामग्री गाझा पट्टीत जाऊ देण्यास इस्रायलनं परवानगी दिली असली, तरी अद्याप गाझा पट्टीतील बॉम्बहल्ले व हवाई हल्ले चालूच आहेत. आता जमिनीवरून गाझा पट्टीत हल्ला करण्याचं नियोजन इस्रायलनं केलं असून हमासचा पूर्णपणे खात्मा करण्याचा निर्धार इस्रायलनं स्पष्ट केला आहे.
एकीकडे गाझा पट्टीत हे युद्ध पेटलं असताना दुसरीकडे या दोन्ही बाजूंना समर्थन देणाऱ्या राष्ट्रांमधील तणाव वाढू लागला आहे. त्यात अमरिका व इराण या देशांचा समावेश आहे. अमेरिकेनं नुकतंच इराणकडून अमेरिकन नागरिकांना लक्ष्य केलं जाण्याची भीती व्यक्त केली असून तसं झाल्यास अमेरिका गप्प बसणार नाही, असा जाहीर इशाराच अमेरिकेनं थेट यूएनच्या सभेत दिला आहे.
“मी १० ज्यू लोकांची हत्या केली आहे आणि…”, हमासच्या हल्लेखोराने वडिलांना केलेला कॉल व्हायरल…
“आम्हाला इराणशी वाद नकोय. पण जर इराण किंवा त्यांच्यावतीने इतर कुणी अमेरिकेच्या नागरिकांवर जगात कुठेही हल्ला केला, तर अमेरिका गप्प बसणार नाही. अमेरिका त्या हल्ल्याचं ठामपणे आणि तातडीने प्रत्युत्तर देईल”, असं अमेरिकेचे कॅबिनेट मंत्री अँटनी ब्रिंकन यांनी संयुक्त राष्ट्राच्या १५ सदस्यी सुरक्षा परिषदेसमोर स्पष्ट केलं. इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील वाढत्या संघर्षावर चालू असलेल्या चर्चेमध्ये अमेरिकेनं हा इशारा दिला आहे.
“अमेरिकेला इराणशी कोणताही संघर्ष नकोय. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध अधिक व्यापक व्हावं, अशी आमची अजिबात इच्छा नाही. पण जर इराण किंवा त्यांच्यावतीने इतर कुणी अमेरिकेच्या नागरिकांवर कुठेही हल्ला केला, तर लक्षात असू द्या, आम्ही आमच्या नागरिकांचं रक्षण करू”, असंही ब्लिंकन या परिषदेत म्हणाले आहेत.
सर्व राष्ट्रांना अमेरिकेचं आवाहन
दरम्यान, ब्लिंकन यांनी यावेळी अमेरिकेच्या वतीने सर्व राष्ट्रांना आवाहन केलं आहे. या युद्धात अमेरिका वा इस्रायलला मदत करणाऱ्या इतर कोणत्याही देशाविरोधात नवी आघाडी उघडण्याचा विचार करणाऱ्या कोणत्याही देशाला इतर सर्व देशांनी मिळून एक संयुक्त संदेश द्यायला हवा. “आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करू नका”, असं या देशांना ठणकावून सांगायला हवं, असंही ब्लिंकन यावेळी म्हणाले. दरम्यान, इराणनं मात्र अमेरिकेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.