संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानव हक्क परिषदेत श्रीलंकेविरोधातील आपल्या ठरावाला अनेक देशांनी पाठिंबा दिल्याचे अमेरिकेने स्वागत केले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला देशात शांतता आणि स्थैर्य हवे असल्याचा स्पष्ट संदेश अनेक देशांनी या ठरावाला दिलेल्या पाठिंब्यामुळे श्रीलंकेला मिळाला आहे, असेही अमेरिकेने म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय समुदाय श्रीलंका सरकारसमवेत सर्व जनतेसाठी शांतता, स्थैर्य आणि विकासासाठी सहकार्य करण्यास बांधील आहे, असा संदेश या ठरावाला मिळालेल्या अनुमोदनावरून स्पष्ट होत असल्याचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या कॅटलिन हेडन यांनी म्हटले आहे.
श्रीलंकेतील ऐक्य आणि विश्वासार्हतेला चालना मिळण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघात ठरावाला पाठिंबा मिळाल्याचे अमेरिकेने स्वागत केले आहे.
श्रीलंकेतील सर्व नागरिकांचे ऐक्य अबाधित राखण्यासाठी श्रीलंका सरकार बांधील आहे, असे आवाहन या ठरावाद्वारे करण्यात आले आहे, असेही हेडन म्हणाल्या.
आंतरराष्ट्रीय मानव हक्कांचे उल्लंघन झाले आहे का, याचा विश्वासार्ह तपास करण्यासाठी या ठरावामुळे श्रीलंका सरकारला प्रोत्साहन मिळेल, असेही त्यांनी म्हटले आहे. कॅनडाचे परराष्ट्रमंत्री जॉन बेअर्ड यांनीही या ठरावाला पाठिंबा मिळाल्याचे स्वागत केले आहे.
अमेरिकेने मांडलेल्या ठरावाला भारतासह अन्य २५ देशांनी पाठिंबा दिला तर पाकिस्तानसह अन्य १३ देशांनी विरोध केला. आठ देशांनी तटस्थ भूमिका घेतली.

Story img Loader