गेल्या दोन वर्षांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात गाझा पट्टीत चालू असलेलं युद्ध अजूनही पूर्णपणे संपलेलं नसून हल्ले चालूच आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलयचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात वॉशिंग्टन व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं. या बैठकीनंतर दोघांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेच डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानाची आता जगभर चर्चा चालू झाली आहे. कारण या पत्रकार परिषदेत बेंजामिन नेतन्याहू यांच्या उपस्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडून गाझा पट्टीवर ताबा मिळवण्याचा उल्लेख केला आहे.
अमेरिकन लष्कर गाझा पट्टीत?
गेल्या दोन वर्षांपासून गाझा पट्टीतील वातावरण धुमसतं असल्यामुळे स्थानिकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केलं आहे. या भागातील इमारती सततच्या बॉम्ब हल्ल्यांमुळे बेचिराख झाल्या आहेत. इथलं जनजीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी या भग्न इमारती पूर्णपणे जमीनदोस्त करून तिथे नवीन शहराची पायाभरणी करण्याचा निर्धार बोलून दाखवला. या प्रक्रियेदरम्यान जर गरज पडली, तर अमेरिकेचं सैन्यदल गाझा पट्टीत तैनात करण्याचीही तयारी ट्रम्प यांनी बोलून दाखवली.
डोनाल्ड ट्रम्प यांचा नेतन्याहू यांच्यासमोर प्रस्ताव
गाझा पट्टीवर अमेरिकेचा ताबा प्रस्थापित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव डोनाल्ड ट्रम्प यांनी या बैठकीदरम्यान नेतन्याहू यांच्यासमोर ठेवल्याचं वृत्त सीएनएनच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. अमेरिकेनं गाझा पट्टीवर अंमल प्रस्थापित करणं ही एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असेल आणि त्यात अमेरिका या भागाची पूर्ण जबाबदारी घेईल, यातून गाझा पट्टीत आणि पर्यायाने मध्य-पूर्व आशियात मोठ्या प्रमाणावर स्थैर्य निर्माण होईल, असंही ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना बैठकीदरम्यान सांगितलं.
पत्रकार परिषदेत काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
गाझा पट्टीतील अद्याप न फुटलेले जिवंत बॉम्ब आम्ही निष्प्रभ करू, असं सूचक विधान यावेळी ट्रम्प यांनी केलं. “आम्ही या भागाची पूर्ण जबाबदारी घेऊ. इथले सगळे जिवंत बॉम्ब आणि शस्त्रास्त्र आम्ही निष्प्रभ करू. तिथला संपूर्ण भाग पूर्णपणे जमीनदोस्त करून, तिथल्या पडक्या इमारती जमीनदोस्त करून तिथे नवीन आर्थिक विकासाची पायाभरणी करायला हवी. यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल. आपण काहीतरी वेगळं काम करायला हवं”, असं ट्रम्प पत्रकार परिषदेत म्हणाले.
नेतन्याहूंचा होकार!
दरम्यान, अमेरिकेनं गाझा पट्टीचा ताबा घेऊन तिथे विकासकामं राबवणं या प्रस्तावाला नेतन्याहू यांनी होकार दिला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी अशी पावलं उचलणं हे सार्थ असल्याचं नमूद केलं. “आमच्याविरोधातले अनेक हल्ले, अनेक कारवाया, दहशतवादी कृत्य या गोष्टींमुळे गेल्या अनेक वर्षांपासून जो भाग कायम चर्चेच्या व घडामोडींच्या केंद्रस्थानी राहिला, त्या भागाच्या भवितव्याकडे डोनाल्ड ट्रम्प वेगळ्या दृष्टीने पाहात आहेत”, असं नेतन्याहू म्हणाले.