परदेशी पाहुण्यांची भारतात फसवणूक होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. फिरण्याच्या किंवा खरेदीच्या हेतुने भारतात येणाऱ्या परदेशी ग्राहकांना काही दुकानदान फसवतात. त्यांची कोट्यवधींचा तोट करतात, असे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघे ३०० रुपयांचे दागिने तब्बल ६ कोटींना विकले गेले आहेत. याप्रकरणी दुकान मालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. न्यूज १८ लोकमतने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अमेरिकेत राहणाऱ्या चेरीश यांनी जयपूरच्या जोहरी बाजारातून दागिने खरेदी केले होते. या दागिन्यांची किंमत ६ कोटी रुपये सांगण्यात आली. चेरिश यांनी हा दागिन्याचा तुकडा विकत घेतला आणि अमेरिकेतील एका प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवला. परंतु, या प्रदर्शनात हा तुकडा बनावट असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे चेरिशला ग्राहकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

हेही वाचा >> NEET परीक्षेच्या निकालासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाची एनटीएला नोटीस; अहवाल मागवला, आता ‘या’ दिवशी होणार पुढची सुनावणी

दुकान मालकानेच केली खोटी तक्रार

६ कोटींचा हा व्यवहार असल्याने चेरिश पुन्हा भारतात परतली आणि तिने जिथून दागिना विकत घेतला होता त्या दुकानात गेली. परंतु, चेरिशच्या तक्रारीकडून दुकानदारांनी दुर्लक्ष केलं. या दुकानाचे मालक राजेंद्र सोनी आणि त्यांचा मुलगा गौरव सोनी यांनी दागिना बनावट असल्याचा दावा फेटाळून लावला. त्यामुळे संतापलेल्या चेरिशने मानक चौक पोलीस ठाण्यात दुकानमालकाविरोधात तक्रार दाखल केली. परंतु, दुकान मालकाने तिच्याचविरोधात खोटा गुन्हा दाखल केला.

दुकान मालक आणि मुलगा फरार

या संपूर्ण प्रकरात चेरिश हतबल झाली. ६ कोटी परत कसे मिळवायचे या विवंचनेत ती होती. त्यामुळे तिने तत्काळ अमेरिकेच्या दुतावासाशी संपर्क साधला. अमेरिकेच्या दुतावासांनी थेट जयपूर पोलिसांकडे याबाबत विचारणा केल्यावर याप्रकरणाचा तपास वेगाने सुरू झाला. त्यामुळे हे दागिने खरोखर बनावट असल्याचं आढळून आलं. दरम्यान, दुकान मालक आणि त्यांचा मुलगा सध्या फरार आहे. तर दागिन्यांसाठी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आी आहे. आरोपीला पकडण्यासाठी जयपूर पोलिसांचं विशेष पथक तयार करण्यात आलं आहे.

हेही वाचा >> International Yoga Day 2024 : चक्क नरेंद्र मोदींनीच दिले योगाचे धडे; VIDEO पाहून तुम्हीही सहज शिकून घ्या!

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात दुकानमालकांनी नुकतीच तीन कोटी रुपयांची अपार्टमेंट खरेदी केल्याचे समोर आले आहे. “तपासात असे आढळून आले आहे की आरोपींनी ३०० रुपये किमतीचे सोन्याचे पॉलिश असलेले चांदीचे दागिने परदेशी व्यक्तीला ६ कोटी रुपयांना विकले आणि तिला सत्यतेचे बनावट प्रमाणपत्र दिले. बनावट प्रमाणपत्र जारी करणाऱ्या नंद किशोरला अटक करण्यात आली असून, फरार पिता-पुत्राचा शोध सुरू आहे, असे उत्तर पोलिस उपायुक्त बजरंगसिंग शेखावत यांनी सांगितले.