US Crime News : एका महिलेला असं वाटलं की तिचं अपहरण होतं आहे. तिने बंदुक काढली आणि उबर ड्रायव्हरच्या डोक्यावर गोळी झाडली. आता या महिलेवर हत्येचा आरोप ठेवला गेला आहे. अमेरिकेतल्या टेक्सास या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे.
नेमका काय घडला प्रकार?
असोसिएट प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार फोएबे कोपस नावाच्या ४८ वर्षीय महिलेने उबर चालक डॅनियल गार्सियावर गोळी झाडली. या घटनेत चालकाचा मृत्यू झाला. या महिलेला असं वाटलं की डॅनियल तिचं अपहरण करुन तिला मेक्सिकोला घेऊन जातोय असं वाटल्याने तिने हे कृत्य केलं.
चालकाच्या कुटुंबाने काय म्हटलं आहे?
डॅनियलला जखमी अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्याच्या कुटुंबीयानी म्हटलं होतं की उपचार सुरु असताना त्याची लाईफ सपोर्ट सिस्टिम काढण्यात आली होती. तर उबरने याविषयी एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे म्हटलं आहे की महिला आधीच घाबरली होती कारण उबर ड्रायव्हर्सच्या अनेक अशा घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र कंपनीच्या प्रवक्त्याने हे म्हटलं आहे की काहीही झालं तरीही आम्ही हिंसेचं समर्थन करु शकत नाही.
फोएबे ही महिला टेक्सासला तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला गेली होती. या महिलेचं टेक्सासमधलं काम उरकल्यानंतर रात्री एका कॅसिनोत आपल्या बॉयफ्रेंडला भेटायचं ठरवलं. त्याचसाठी तिने उबर बुक केली होती. ही महिला टॅक्सीत बसली. तिचा प्रवास सुरु झाला त्यानंतर तिने हायवेवर मॅक्सिकोच्या दिशेने जात असल्याचे काही संकेत पाहिले. यानंतर कोपासने असं म्हटलं आहे की तिला हे वाटलं की डॅनियल तिचं अपहरण करुन मेक्सिकोला घेऊन जातोय. त्यानंतर तिने तिच्या बॅगेतून रिव्हॉल्वर काढली. तिने ड्रायव्हरच्या डोक्यावर गोळी झाडली. यानंतर कारचाही अपघात झाला. त्यावेळी तिथे पोलीस पोहचले आणि त्यांना सगळा प्रकार लक्षात आला. या घटनेचा एक फोटो काढून कोपासने तिच्या बॉयफ्रेंडलाही पाठवला होता.
पोलिसांनी काय म्हटलं आहे?
नेमकं काय घडलं आहे याची चौकशी आम्ही करतो आहोत. महिला जे काही सांगते आहे त्याचं आम्ही समर्थन करत नाही. तिचं अपहरण झालं की डॅनियल तसं करण्याच्या प्रयत्नात होता असं वाटत नाही. तसंच डॅनियलच्या पत्नीनेही असं म्हटलं आहे की ही महिला खोटे आरोप करते आहे. आता या प्रकरणाची चौकशी आम्ही करतो आहोत.