अमेरिकेने ड्रोन हल्ला करत दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीला ठार केलं आहे. मोस्ट वॉण्टेड आणि ९/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड असणाऱ्या जवाहिरीचा अमेरिकेने ड्रोन हल्ला करत खात्मा केला. २०११ मध्ये ओसामा बिन लादेनला ठार करण्यात आल्यानंतर जवाहिरी अल-कायदाचं नेतृत्व करत होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जवाहिरीचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
या घटनेनंतर अफगाणिस्तानमधील सत्ताधारी तालिबान सरकारने अमेरिकेच्या या कृत्याचा निषेध केला आहे. अमेरिकेनं अशाप्रकारे अफगाणिस्तानच्या भूमीवर हल्ला करून ‘दोहा करारा’चं उल्लंघन केल्याचं तालिबाननं म्हटलं आहे. तालिबानने एक निवेदन जारी करत या घटनेचा निषेध केला आहे.
तालिबान राजवटीचे प्रवक्ते जबिउल्ला मुजाहिद यांनी आपल्या निवेदनात म्हटलं की, “इस्लामिक अमिराती (अफगाणिस्तान) या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करते. हा हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय तत्त्वांचं आणि दोहा कराराचं स्पष्ट उल्लंघन आहे. अफगाणिस्तानच्या भूमीवर अमेरिकेनं केलेली कारवाई ही दोन्ही देशांच्या हिताविरोधी आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणं दोन्ही देशातील संबंध बिघडवू शकतं, असंही तालिबाननं निवेदनात म्हटलं आहे.
जवाहिरीने ९/११ हल्ल्यामध्ये समन्वय साधण्याचं काम केलं होतं. या हल्ल्यात ३००० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. जवाहिरीच्या डोक्यावर २४ मिलियन डॉलर्सचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये रविवारी सकाळी ड्रोन हल्ला केला असता त्यामध्ये जवाहिरीचा मृत्यू झाला आहे.