नवी दिल्ली : गेल्या वर्षी अमेरिकेने विक्रमी १ लाख ४० हजार विद्यार्थी व्हिसा जारी केले असून या वर्षी भारतीय विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये संभाव्य वाढ होण्याची शक्यता भारतातील अमेरिकन वाणिज्य दूतावासातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. भारतातील यूएस मिशनने गुरुवारी देशभरात आठवा वार्षिक विद्यार्थी व्हिसा दिवस साजरा केला.
हेही वाचा >>> अजित डोवाल तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी; भारत सरकारकडून नियुक्तीपत्र जाहीर
याअंतर्गत नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबई येथील कॉन्सुलर अधिकाऱ्यांनी विद्यार्थी व्हिसा अर्जदारांच्या मुलाखती घेतल्या. दिल्लीतील अमेरिकन दूतावासात सकाळपासूनच विद्यार्थ्यांची लांबलचक रांग दिसत होती. मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शिकतात. गेल्या वर्षी भारतातील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाने १ लाख ४० हजार पेक्षा जास्त विद्यार्थी व्हिसा जारी केले. जे इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहेत.
अमेरिकेच्या दूतावासातील कार्यवाहक कौन्सुल जनरल सय्यद मुजतबा अंद्राबी यांनी सांगितले की, दिवसभरात सुमारे चार हजार विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जातील असा अंदाज आहे. विद्यार्थी व्हिसा आमच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे. दोन्ही देशांमधील शैक्षणिक देवाणघेवाण हे या प्रशासनाच्या आणि आमच्या ध्येयाच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे. अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेट्टी यांनी एप्रिलमध्ये एका मुलाखतीत पीटीआयला सांगितले की अमेरिका विद्यार्थी व्हिसाला ‘सर्वोच्च प्राधान्य’ देते कारण विद्यार्थ्यांचे हितसंबंध आयुष्यभर टिकतात हे त्यांना माहीत आहे.