अमेरिकेतील ओक्लाहोमा येथील टल्सा येथे फोटोवरुन झालेल्या क्षुल्लक वादातून कर्मचाऱ्याने केलेल्या गोळीबारात ग्राहकाचा मृत्यू झाला. ग्राहकानेही कर्मचाऱ्याच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, यातून तो कर्मचारी बचावला असला तरी दुकानातील दोन जण यात जखमी झाले आहेत.

टल्सामधील वॉलग्रीन या फार्मसी कंपनीच्या दुकानात गोळीबाराची घटना घडली. स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, दुकानातील छायाचित्र विभागात एका ग्राहकाचा काऊंटरवरील कर्मचाऱ्याशी वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की दोघांनी स्वत:कडील बंदुकीने एकमेकांच्या दिशेने गोळीबार केला. यात ग्राहकाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या काऊंटरवर बसलेला कर्मचारी आणि तिथे थांबलेला एक ग्राहक या गोळीबारात जखमी झाले.

दोघांमध्ये नेमका काय वाद झाला, याचा पोलीस तपास करत आहे. चोरटा ग्राहक बनून चोरीच्या उद्देशाने दुकानात आला होता का?, याचा देखील पोलीस तपास करत आहे. प्राथमिक माहिती नुसार छायाचित्रावरुन ग्राहक आणि काऊंटरवरील कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला होता, या वादातून दोघांनी गोळीबार केला. ग्राहकाच्या मुलीचा मृत्यू झाला होता आणि तिच्याच छायाचित्रावरुन वाद झाल्याचेही एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. पोलिसांनी वादाचे नेमके कारण काय होते, यावर प्रतिक्रिया देणे टाळले.

Story img Loader