* भाजपच्या संसदीय मंडळास मोदींचा सल्ला
* लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज
आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरलेल्या केंद्रातील काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या नाकर्तेपणावर इंटरनेट आणि सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून हल्ला चढविण्याचा मंत्र गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत बोलताना दिला. उद्या, बुधवारी केंद्रातील सत्तेची सलग नऊ वर्षे पूर्ण करणाऱ्या यूपीएच्या वर्षदिनाच्या पूर्वसंध्येला संसदीय मंडळाची बैठक बोलावून भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष पूर्णपणे सज्ज असल्याची घोषणा केली.
आपले खास विश्वासू अमित शाह यांना राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून उत्तर प्रदेशचा प्रभार दिल्यानंतरच संसदीय मंडळाच्या बैठकीत मंगळवारी पहिल्यांदा सहभागी होताना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया आणि इंटरनेटचा पुरेपूर वापर करून पक्षाने तरुण आणि सजग नागरिकांपर्यंत पोहोचून मनमोहन सिंग सरकारवर हल्ला चढविण्याची सूचना केली. गोवा येथे पुढील महिन्यात होऊ घातलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा वापर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनिती निश्चित करण्यासाठी व्हावा, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यूपीएच्या नऊ वर्षांंच्या कामगिरीवर मोदी यांनी खरपूस टीका केली.
लोकसभा निवडणूक कधीही झाली तरी भाजप सज्ज असल्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. येत्या दिवाळीनंतर होऊ घातलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि मिझोराम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका कोणत्या मुद्यांवर लढायच्या यावरही बैठकीत चर्चा झाली. गोव्याच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राजकीय, आर्थिक, परराष्ट्र व संरक्षणविषयक मसुद्यांनाही मंजुरी देण्यात आली.
आज हल्लाबोल
बुधवारी सकाळी ११ वाजता लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली पत्रकार परिषद आयोजित करून सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरलेल्या यूपीएच्या नऊ वर्षांंच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत. घोटाळे, भ्रष्टाचार आणि महागाईसाठी कारणीभूत ठरलेल्या यूपीए सरकारच्या अपयशाकडे लक्ष वेधण्यासाठी भाजप २७ मे ते २ जून दरम्यान देशव्यापी जेलभरो आंदोलन छेडणार आहे.
पंतप्रधानपदाबाबत चर्चा नाही
लोकसभा निवडणुकीत भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल याविषयी आजच्या बैठकीत चर्चा झाली नाही. हा निर्णय योग्यवेळी घेण्यात येईल, असे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. नरेंद्र मोदी यांना विधानसभा व लोकसभा निवडणुकांसाठी निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्षपद सोपविण्याच्या मुद्यावरही बैठकीत चर्चा झाली नाही. भाजपमधील अडवाणी यांच्या नेतृत्वाखालील गटाचा पंतप्रधानपदाचे उमेदवार किंवा प्रचार समितीच्या अध्यक्षपदासाठी मोदींच्या नावाला विरोध असल्याचे समजते. संसदीय मंडळाच्या बैठकीसाठी सकाळी दिल्लीत दाखल झाल्यानंतर मोदी यांनी भाजपचे सर्वोच्च नेते लालकृष्ण अडवाणी, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली आणि राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली.
यूपीएवर हल्ल्यासाठी ‘नेटास्त्र’ वापरा!
आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरलेल्या केंद्रातील काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या नाकर्तेपणावर इंटरनेट आणि सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून हल्ला चढविण्याचा मंत्र गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत बोलताना दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-05-2013 at 03:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use internet for attact on upa