मुजफ्फरनगर दंगलींसह अनेक ठिकाणी देशामध्ये अशांतता आणि असंतोष निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाचा खुबीने वापर केला जातो. किंबहुना अनेकदा सोशल नेटवर्किंग साईट्सवर द्वेष पसरविणारे मजकूर गोपनीयतेचे कवच वापरत प्रसिद्ध केले जातात, असा दावा भारताच्या केंद्रीय गुप्तचर खात्याचे प्रमुख असिफ इब्राहिम यांनी केला. भारतात अनेक स्फोटांमध्ये सहभागी असलेली इंडियन मुजाहिद्दीन ही अतिरेकी संघटना देशातील इतर दहशतवादी संघटनांशी साटंलोटं करीत असून त्यामुळे अंतर्गत सुरक्षिततेसमोर आव्हान निर्माण झाले आहे, असा इशाराही इब्राहिम यांनी दिला.
येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य पोलीस महासंचालकांच्या तीन दिवसीय परिषदेमध्ये ते बोलत होते. वरकरणी निरुपद्रवी वाटणाऱ्या आणि ‘जगाशी जोडणाऱ्या’ सोशल नेटवर्किंग साईट्सची दुसरी बाजू भारताच्या गुप्तचर विभागाने प्रथमच उघडपणे मान्य केली.
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात झालेल्या मुझफ्फरनगर दंगलींमागेही सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून फिरणारी एक ध्वनिचित्रफीत होती, असेही असिफ इब्राहिम म्हणाले. भारताच्या अखंडत्वासमोर जी अनेक आव्हाने आहेत, त्यापैकी सर्वात मुख्य आव्हान हे सोशल मीडियाचे असेल असा इशारा द्यायलाही गुप्तचर खात्याचे प्रमुख विसरले नाहीत.
एकटय़ा यासिन भटकळच्या अटकेमुळे ४९ प्रकरणांचा उलगडा होण्यास मदत झाली. इंडियन मुजाहिद्दीनमुळे असलेला खरा धोका हा त्यांना सीमेपलीकडून मिळणाऱ्या सूचनांमध्ये आहे आणि त्यामुळेच सतर्कतेची अधिक आवश्यकता आहे, असे इब्राहिम यांनी स्पष्ट केले.

Story img Loader