पणजीतून उमेदवारी नाकारल्याने अपक्ष लढण्याचा निर्णय
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पणजी मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी पणजीतून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने गुरुवारी ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. उत्पल पर्रिकर यांनी आपल्याला पणजी मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली होती, मात्र पक्षाने त्यांना पणजी मतदारसंघातून उमेदवारी नाकारली आणि वादग्रस्त आमदार बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या उत्पल यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.
‘‘पणजीमधून तिकीट मिळवण्याचे मी सर्वतोपरी प्रयत्न केले. माझ्या पक्षाची मनधरणी करण्याचे माझे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. मला केवळ पक्ष सदस्यांचाच नव्हे, तर पणजीतील जनतेचाही पाठिंबा असतानाही उमेदवारी नाकारण्यात आली. याचा अर्थ पक्षात कुणाचा तरी मला विरोध आहे. त्यामुळे मी पक्ष सोडत असून माझे राजकीय भवितव्य आता पणजीतील जनतेच्या हाती आहे,’ असे उत्पल पर्रिकर यांनी शुक्रवारी सांगितले. मनोहर पर्रिकर हे भाजपचे गोव्यातील वजनदार नेते होते. त्यांनी २५ वर्षे पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांचा २०१९मध्ये कर्करोगाने मृत्यू झाला.
आपल्या नैतिक मूल्यांसाठी भूमिका घेण्याची वेळ आली आहे. मला पणजीतून उमेदवारी नाकारली, याचा अर्थ पक्षात कुणाचा तरी मला विरोध आहे. त्यामुळे मी पक्ष सोडत आहे. – उत्पल पर्रिकर