उत्तर प्रदेशच्या बेहता मुजावर परिसरात आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. एक स्लीपर बस एका दुधाच्या कंटेनरला मागून धडकल्यामुळे हा अपघात झाला. बिहारच्या शिवगढहून दिल्लीच्या दिशेने ही बस जात होती. लखनौ-आगरा महामार्गावर बेहता मुजावर परिसरात समोर उभ्या दुधाच्या कंटेनरला बस मागून जोरात धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यात बस आणि कंटेनरचाही अक्षरश: चुराडा झाला. अपघातात मृत झालेल्या व्यक्तींमध्ये दोन महिला व एका लहानग्याचा समावेश आहे. याशिवाय २० जण गंभीर जखमी झाल्याचीही प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
डबल डेकर प्रवासी बस…
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस डबलडेकर प्रवासी वाहन असल्यामुळे त्यात मोठ्या संख्येनं प्रवासी प्रवास करत होतं. दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या या बसची पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी आग्रा-लखनौ महामार्गावर एका दुधाच्या कंटेनरशी धडक झाली. हा कंटेनर महामार्गाच्या कडेला उभा असताना बसनं मागच्या बाजूने कंटेनरला जोरात धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत काही स्थानिक लोकांनी बसमधून जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच बचावकार्य वेगाने सुरू केलं. जखमींना तातडीने नजीकच्या बांगरमौ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं.
अपघाताचं कारण काय?
काही प्रत्यक्षदर्शींच्यामते स्लीपर बसच्या चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. महामार्गावर वेगाने जाणाऱ्या बसचालकाला वेगावर नियंत्रण ठेवता न आल्यामुळे बस थेट दुधाच्या कंटेनरला जाऊन धडकली.