उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली आहे. मागील काही आठवड्यांपासून भाजपा नेत्यांच्या उत्तर प्रदेशात हालचाली वाढल्या आहेत. उत्तर प्रदेशातील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजपाकडून जोरात मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षही विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. उत्तर प्रदेशात विरोधक भाजपाविरोधात आघाडी करण्याची चर्चा सुरू असतानाच समाजवादी पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आघाडी करण्यासाठी बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेस कुमकुवत असल्याचं सांगत स्वतंत्र निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट केलं.
उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अखिलेश यादव यांनी ही भूमिका मांडली. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले,”योगी आदित्यनाथ यांच्यामुळे उत्तर प्रदेशचा विकास खुंटला असून, त्यांनी भ्रष्टाचार आणि दमन करण्याला प्रोत्साहन दिलं आहे. लोकांना आता बदल हवा आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव अटळ आहे,” असा दावा त्यांनी केला.
“मोठ्या पक्षांसोबत आघाडी करण्याचा माझा अनुभव चांगला नाही. आता मी त्यांच्यासोबत आघाडी करण्याच्या भानगडीत पडणार नाही”, असं म्हणत अखिलेश यादव यांनी अप्रत्यक्षपणे मायावती यांची बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेससोबत आघाडी करण्यार नसल्याची भूमिका स्पष्ट केली. “भाजपाचा पराभव करण्याची ज्यांची इच्छा आहे. मी त्यांना आवाहन करेन की, त्यांनी समाजवादी पार्टीला पाठिंबा द्यावा, असंही अखिलेश यादव म्हणाले.
हेही वाचा- सरकारच्या आकडेवारीपेक्षा करोना मृतांची संख्या ४३ पट जास्त; अखिलेश यादव यांचा दावा
“आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागणार आहे. उत्तर प्रदेशातील नागरिकांचं नेतृत्व करण्यात भाजपा अपयशी ठरली आहे. लोकांना सरकारने वाऱ्यावर सोडलं आहे. हे दोन इंजिनचं सरकार आहे. एक केंद्रात आणि दुसरं उत्तर प्रदेशात. हे दोन्ही सरकार दोन दिशेला काम करत आहेत. तर उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष प्रचंड कुमकुवत झाला आहे. २०१७ मध्ये त्यांच्यासोबतचा माझा अनुभव चांगला नाही. आम्ही त्यांना १०० जागा दिल्या, पण जिंकू शकलो नाही. उत्तर प्रदेशच्या जनतेनं काँग्रेसला नाकारलं,” असं अखिलेश यादव म्हणाले.