Uttar Pradesh Assembly : उत्तर प्रदेशच्या विधानसभेत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज (४ फेब्रुवारी) सकाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाच सुरू झालं आणि विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी विधानसभेत घडलेल्या एका प्रकारावरून चांगलाच संताप व्यक्त केला. उत्तर प्रदेशच्या विधानसभेत एका आमदाराने पान मसाला खाऊन पिचकारी मारल्याचा प्रकार घडला. या प्रकरावरून विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी संबंधित आमदाराला चांगलेच खडबोल सुनावले. तसेच घडलेल्या या प्रकारावर विधानसभा अध्यक्षांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी सभागृहात घडलेल्या या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत हा प्रकार अनुशासनहीन असल्याचं म्हटलं. तसेच विधानसभेत ज्या आमदाराने पान मसाला खाऊन पिचकारी मारली ते आमदार कोण आहे? त्यांना आम्ही सीसीटीव्हीमध्ये पाहिलं आहे. मात्र, आता सभागृहात मी त्यांचं थेट नाव घेऊन त्यांना अपमानित करणार नाही”, असं सतीश महाना यांनी म्हटलं. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशच्या विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरु असताना एका आमदाराने सभागृहात पान मसाला खाऊन पिचकारी मारल्याचा प्रकार घडला. या प्रकारावरून विधानसभा अध्यक्षांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच हे कृत्य ज्या आमदाराने केलं त्यांना सतीश महाना कडक शब्दांत सुनावलं. विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी म्हटलं की, “विधानसभेच्या एका सदस्याने पान मसाला खाऊन सभागृहात पिचकारी मारल्याच्या प्रकाराबाबत मला सांगण्यात आलं. त्यानंतर मी वैयक्तिकरित्या तो परिसर स्वच्छ करून घेतला. तसेच व्हिडीओद्वारे संबंधित आमदार कोण आहे हे आम्ही पाहिलं आहे.”
#WATCH | Uttar Pradesh Assembly Speaker Satish Mahana raised the issue of some MLA spitting in the House after consuming pan masala. He said that he got the stains cleaned, urged other MLA to stop others from indulging in such acts and also appealed to the MLA to step forward and… pic.twitter.com/VLp32qXlU8
— ANI (@ANI) March 4, 2025
“आता थेट सभागृहात मी त्या संबंधित आमदाराचे नाव घेऊन आपमानित करत नाही. कारण त्याचं सभागृहात नाव घेतलं तर हा अपमान होईल, म्हणून मी त्यांचं नाव घेणं टाळत आहे. पण सर्व सदस्यांना मी विनंती करतो की, जर कोणी असं करताना दिसलं तर त्यांनी त्यांना लगेचच थांबवा. ही सर्वच आमदारांची जबाबदारी आहे. आता ज्या आमदाराने हे कृत्य केलं त्या आमदाराने मला येऊन भेटलं तर चांगलं होईल अन्यथा मला त्यांना बोलावं लागेल”, असा इशारा सतीश महाना यांनी दिला. दरम्यान, या प्रकारावारून त्या संबंधित आमदारावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.