Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संस्कृत भाषेच्या विद्यार्थ्यांसाठी एका शिष्यवृत्ती योजनेची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशतील संस्कृतच्या सर्व विद्यार्थ्यांना आता शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या योजनेच्या घोषणेनंतर शिष्यवृत्ती वाटपाचा शुभारंभ देखील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते पार पडला आहे. तसेच राज्यभरात गुरुकुल पद्धतीच्या निवासी संस्कृत शाळा पुन्हा सुरू करण्यासंदर्भातही त्यांनी भाष्य केलं. योगी आदित्यनाथ यांनी संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्याबाबत आवाहन करत विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषा गांभीर्याने अंगिकारण्यास सांगितलं आहे.

उत्तर प्रदेशाथील ६९ हजार १९५ संस्कृत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटपाचा शुभारंभ योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते रविवारी (२७ ऑक्टोबर) संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ, वाराणसी येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते संस्कृत शिष्यवृत्ती योजनेचे काही चेक (धनादेश) काही विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. मात्र, यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्यावर आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

हेही वाचा : देशाची प्रतिमा मलिन करणे अयोग्य, मणिपूरप्रकरणी परराष्ट्र मंत्र्यांचे विरोधकांना खडेबोल

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चेकचे वाटप करण्यात आलेले काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून उत्तर प्रदेश सरकारच्या संस्कृत शिष्यवृत्ती योजनेवरून लोकांनी ट्रोलही केलं आहे. कारण विद्यार्थ्यांना फक्त ३०० रुपयांचा चेक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते देण्यात आले आहेत. यावरून उत्तर प्रेदेश सरकारवर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी टीका करत ट्रोल केलं आहे. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काय म्हणाले?

“संस्कृतच्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरू केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानू इच्छितो. कारण ही योजना भाषेसाठी महत्वाची आहे, तसेच देशाच्या संस्कृतीसाठी देखील महत्वाची आहे. मात्र, संस्कृत ही भाषा लोकांमध्ये अज्ञात कशी आहे? हे एकूण मला नेहमीच धक्का बसतो. पण आता विद्यार्थी संस्कृत भाषा शिकत आहेत. तसेच जो मानवतेच्या बाजूने आहे, तो संस्कृतचाही समर्थक आहे. मात्र, मागच्या सरकाच्या काळात संस्कृत शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. संस्कृत ही भाषा संगणक, विज्ञान यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये देखील उपयुक्त आहे. त्यामुळे आम्ही संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहोत”, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.

दरम्यान, “उत्तर प्रदेशमध्ये १.५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी संस्कृत भाषा शिकत आहेत. त्यांनी आपले जीवन संस्कृतीला समर्पित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश संस्कृत आणि देशाच्या संस्कृतीप्रती अधिक समर्पित होत आहे. संस्कृत ही भाषा जगभरात पोहोचली पाहिजे, अशी आमची इच्छा आहे”, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

विरोधकांची भाजपावर टीका

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून ३०० रुपयांचे चेक वितरित करण्यात आले. पण यावरूनच विरोधकांनी टिकेची झोड उठवली आहे. ‘हे फक्त भाजपाच करू शकतं. यामधून असं दिसतं की ३०० रुपयांचे चेक वितरित करणयात आलेल्या चेकला छापण्यासाठी अधिक खर्च केला असेल’, अशी खोचक टीका उत्तर प्रदेश सरकारवर सोशल मीडियावर आणि विरोधक करत आहेत.