अतिक आणि अशरफ अहमदच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. उत्तर प्रदेशात आता दंगली होत नाहीत. उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आहे. आता कोणताही गुन्हेगार किंवा माफिया कोणत्याही उद्योजकाला धमकावत नाही, उत्तर प्रदेश सरकार तुम्हाला उत्तम कायदा सुव्यस्थेची खात्री देतं, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
हेही वाचा >> अतिक-अशरफच्या हत्येवरून युपी पोलिसांच्या भूमिकेवर संशय, सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी
“जे माफिया आधी राज्यासाठी संकट होते, आता ते स्वतः संकटात आहेत. आमच्या काळात उत्तर प्रदेशात एकदाही संचारबंदी लागलेली नाही. कोणत्याही रस्त्यावर आता भीती वाटत नाही. उत्तर प्रदेश आता विकासासाठी ओळखलं जातं. पूर्वी उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्था खराब होती”, असंही ते म्हणाले.
जिथे रस्त्यांवर खड्डे दिसायला सुरुवात झाली तिथून उत्तर प्रदेशची सीमा सुरू झाली, असं पूर्वी म्हटलं जायचं. उत्तर प्रदेशची आंतरराज्यीय कनेक्टिव्हिटी आम्ही जोडली आहे, असंही ते पुढे म्हणाले.
अतिक-अशरफ हल्लाप्रकरण नेमकं काय?
अतिक अहमद आणि अशरफ अहमद याची शनिवारी हत्या करण्यात आली. या दोघांना अस्वस्थ वाटू लागल्याने पोलिसांनी त्यांना प्रयागराज येथील रुग्णालयात नेलं. रुग्णालयात जात असताना प्रवेशद्वाराजवळच माध्यम प्रतिनिधींनी या दोघांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. हे दोघेही काही बोलणार इतक्यात त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. माध्यम प्रतिनिधींच्या घोळक्यात असणाऱ्या दोघांनीच या दोघांवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारामुळे अतिक आणि अहमदचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर हल्ला करणारे दोघेजण आणि त्यांचा एक साथीदार पोलिसांना शरण गेले.