उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ च्या निमित्ताने राजकीय रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशाचं या निवडणुकांकडे लक्ष असतानाच आता विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी “मी पुन्हा येईन”चा नारा दिला आहे. गेल्या ३५ वर्षांत उत्तर प्रदेशात एकही मुख्यमंत्री सलग दुसऱ्यांदा जिंकून आलेला नाही. मात्र, येत्या निवडणुकीत मी राज्यातील ही प्रथा मोडून दाखवेन आणि पुन्हा सत्तेत येईन असा मोठा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. टाइम्स नाऊ नवभारत आयोजित ‘नवभारत नवनिर्माण मंच-उत्तर प्रदेश’मध्ये बोलताना योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले की, “सध्याच्या कलांनुसार भाजपाला ३५० पेक्षा कमी जागा मिळणार नाहीत. पक्ष विकास आणि राष्ट्रवादाच्या अजेंड्यावर ही निवडणूक लढेल.” याचसोबत, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ४०० जागा जिंकण्याच्या केलेल्या विधानावर देखील योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अखिलेश यादव यांना मोजता नाही. खरंतर सर्वेक्षण संघाने त्यांना असं सांगितलं असेल की, सपा ४०० जागांवर मागे असेल. पण त्यांनी चुकीची माहिती दिली. शेवटी, सत्तेवर कोण येणार आहे हे त्यांनाही माहित आहे”, असा टोलाही योगी आदित्यनाथ यांनी लगावला.
डबल-इंजिन सरकारचा उत्तर प्रदेशला फायदा!
“केंद्र आणि राज्य अशा भाजपाच्या डबल-इंजिन सरकारचा उत्तर प्रदेशला फायदा झाला आहे. काँग्रेस, सपा आणि बसपा सरकारांनी एकत्रित केलेल्या विकासापेक्षा जास्त विकास गेल्या साडेचार वर्षांमध्ये भाजपाने उत्तर प्रदेशात केला आहे. त्यामुळे, येत्या निवडणुकीत आम्ही आमच्या कल्याणकारी योजना आणि रोजगार निर्मिती यासारख्या कामांबद्दल बोलू शकू”, असंही दावा योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
‘राष्ट्र धर्म’ महत्वाचा
योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘राष्ट्र धर्म’ महत्वाचा आहे. आपण देशाला समर्पित झालं पाहिजे. आम्ही यशस्वी झालो आहोत कारण आमच्या योजना सर्वांसाठी होत्या आणि त्यांचा उद्देश कोणत्याही विशिष्ट जात किंवा समाजाला लाभ देण्यासाठी नव्हता.
भाजपा हा लोकशाही पक्ष!
गुजरातसह विविध राज्यांतील भाजपा नेत्यांना पदांवरुन हटवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं आहे. “भाजपा एक लोकशाही पक्ष आहे. पक्ष व्यक्तीपेक्षा मोठा आहे आणि देश पक्षापेक्षा मोठा आहे, अशी आमची संस्कृती आहे. भाजपा परिवारवादावर विश्वास ठेवत नाही. पक्षाचे कार्यकर्ते आदेशांप्रमाणे काम करतात. पद नाही तर काम महत्वाचं आहे.”