Uttar Pradesh Crime : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये काही दिवसांपूर्वी मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतची हत्या झाल्याची घटना घडली. या घटनेने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. या घटनेला काही दिवस होत नाही तोच आता आणखी एक खळबळजनक हत्याकांड मेरठमधूनच उघडकीस आलं आहे. एका महिलेने आणि तिच्या प्रियकराने मिळून तिच्या पतीचा गळा दाबून हत्या केली आणि सर्पदंशाने मृत्यू झाल्याचं नाटक केलं. मात्र, या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे.

रविता नावाच्या महिलेने तिच्या प्रियकराबरोबर मिळून तिच्या पतीची हत्या केली. मात्र, पतीच्या हत्येचा ज्या प्रकारचा कट रचला होता, हे जेव्हा समोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. सर्वात आधी महिलेने तिच्या पतीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर आपल्या पतीला सापाने चावा घेतल्याचा बनाव रचला. जेणेकरून आपल्या पतीचा मृत्यू हा सापाने चावा घेतल्यामुळे झाला हे सांगता येईल यासाठी हा संपूर्ण बनाव रचला. मात्र, पतीच्या मृतदेहाचं जेव्हा शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली.

झालं असं की, महिलेने तिच्या पतीचा झोपेतच गळा दाबून हत्या केली. त्यानंतर सर्पदंशाने मृत्यू झाल्याचं नाटक करण्यासाठी पतीच्या बेडवर एक जिवंत साप आणून सोडला. त्यानंतर अमित कश्यप उर्फ ​​मिक्की हा मृत व्यक्ती त्याच्या बेडवर आढळून आला. तेव्हा त्याच्या खोलीत एक जिवंत साप आढळून आला. पण जेव्हा मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. तेव्हा शवविच्छेदन अहवालात अमितचा मृत्यू विषबाधेमुळे नाही तर गुदमरल्यामुळे झाल्याचं उघड झालं. त्यामुळे पोलिसांना हत्येचा संशय आला आणि पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली. यानंतर पोलिसांनी पत्नी रविता आणि तिचा प्रियकर अमरदीप या दोघांना अटक केली आणि संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला.

या घटनेबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, “अमरदीपने महमूदपूर शिखेडा गावातील एका सर्पमित्राकडून १००० रुपयांना एक साप खरेदी केला होता. हत्येच्या रात्री दोघांनी अमित झोपेपर्यंत वाट पाहिली आणि नंतर त्याचा गळा दाबून खून केला. मात्र, या संपूर्ण प्रकरणाबाबत कोणाला हत्येचा संशय येऊ नये म्हणून त्यांनी साप त्याच्या खोलीत ठेवला. पोलीस तपासात असं दिसून आलं की रविता आणि अमरदीप यांचे एका वर्षापासून प्रेमसंबंध होते. अमितबरोबर मजूर म्हणून काम करणारा अमरदीप वारंवार त्याच्या घरी येत असे. अमितला अलिकडेच त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंध समजले होते. तो त्याला विरोध करू लागला होता. मात्र, पती प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्यामुळे पत्नी आणि तिच्या प्रियकराने त्याच्या हत्येचा कट रचला. तेच पकडले जाऊ नये म्हणून त्यांनी गुगल आणि युट्यूबवर हत्येच्या तंत्रांचा शोधही घेतला होता, अशी माहिती तपासात समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं.