Uttar Pradesh Crime : देशभरातील विविध शहरात दररोज गुन्हेगारीच्या घटना घटताना पाहायला मिळत आहेत. गुन्हेगारीच्या घटनामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये गोळीबार, जाळपोळ, हाणामारी, खून, दरोडा, लैंगिक अत्याचार अशा वेगवेगळ्या घटना दररोज समोर येत आहेत. आता उत्तर प्रदेशातील नोएडा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे.
नोएडा शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीने स्वत:च्या पत्नीची हातोड्याने हत्या केल्याची घटना घडली आहे. तसेच पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन हत्येची कबुली देत आत्मसमर्पन केलं. ही घटना शुक्रवारी नोएडातील सेक्टर १५ येथील एका उच्चभ्रू सोसायटीत घडली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेतील आरोपी हा इंजिनीअर असल्याची माहिती सांगितली जात आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
नोएडातील एका व्यक्तीला त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयच्या माध्यमातून त्याने पत्नीची हातोड्याने हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, संगणक अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या ५५ वर्षीय नूर-उल्लाह हैदरला त्याच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. यावरून त्या दोघांमध्ये काही दिवसांपासून भांडण होत असे. दरम्यान, कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की शुक्रवारी दुपारी त्याने त्यांच्या बेडरूमचा दरवाजा बंद केला आणि त्यानंतर पत्नीच्या डोक्यावर हातोड्याने वार केले, यामध्ये पत्नीचा जीव गेला.
पीडित महिलेचं अस्मा खान असं नाव होतं. ती नोएडाच्या सेक्टर ६२ मधील एका खासगी फर्ममध्ये सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करत होती. तसेच ती तिच्या पती आणि दोन मुलांसह नोएडात राहत होती. या घटनेबाबत माहिती सांगताना पिडितेच्या बहिणीने सांगितलं की, शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आम्हाला एक फोन आला आणि सांगितलं की माझी पत्नी फरीदा (असमाची बहीण) ही मरण पावली. त्यावर फरीदाने काय झालं असं विचारलं तेव्हा बहिणीच्या मलाने सांगितलं की त्याच्या वडिलांनी तिला मारलं. त्यानंतर आम्ही नोएडाला पोहोचलो आणि पोलिसांना कळवलं.
दरम्यान, अस्मा आणि तिचा पती दुपारच्या सुमारास त्यांच्या खोलीत होते, तेव्हा पतीने तिचा चेहरा उशीने दाबला आणि तिच्या डोक्यावर हातोड्याने अनेक वार केले. या घटनेबाबतची माहिती देताना फेज १ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “हत्येनंतर हैदर आत्मसमर्पण करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये २ किमी चालत आला. त्यानंतर त्यांने पोलीस ठाण्यात असलेल्या पोलिसांना सांगितलं की त्याने प्रेमसंबंधाच्या संशयावरून त्याच्या पत्नीची हत्या केली आहे. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. तसेच पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याचं पती हैदरने मान्य केलं असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.