Uttar Pradesh Crime News : गेल्या काही महिन्यांपासून उत्तर प्रदेशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आता उत्तर प्रदेशातील नोएडामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नोएडामधील एका हॉटेलच्या खोलीत एका इंजिनिअर व्यक्तीने आपलं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, सदर इसमाने जीवन संपवण्यापूर्वी त्याची पत्नी आणि तिच्या कुटुंबाकडून होणाऱ्या मानसिक छळाबाबत एक व्हिडीओ करत गंभीर आरोप केले आहेत.

मोहित कुमार असं या इसमाचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडीओमध्ये मोहित कुमारने असा दावा केला आहे की त्याची सर्व मालमत्ता पत्नी आणि सासरकडील मंडळींनी पत्नीच्या नावावर करण्यासाठी दबाव आणला होता. अन्यथा खोटे आरोप करत गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली होती, असा आरोप व्हिडीओत मोहितने केला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

वृत्तानुसार, मोहितने म्हटलं की, “तुम्हाला हा व्हिडीओ मिळेल तोपर्यंत मी या जगातून निघून गेलेला असेन. जर पुरुषांसाठी कायदा असता तर कदाचित मी हे पाऊल उचललं नसतं. माझी पत्नी आणि तिच्या कुटुंबाकडून होणारा मानसिक छळ मी सहन करू शकलो नाही. आई, बाबा, कृपया मला माफ करा”, असं मोहितने व्हिडीओत म्हटल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मोहितने प्रिया यादवशी लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांचं चांगलं चाललं होतं. मात्र, काही दिवसांनी प्रियाला बिहारच्या समस्तीपूरमध्ये शिक्षिकेची नोकरी मिळाली. त्यानंतर मोहितच्या कुटुंबीयांनी सांगितलं की प्रियाने वेगळं वागायला सुरुवात केली. तसेच तिच्या आई आणि भावाने मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.

मोहितने पुढे व्हिडीओत असं म्हटलं की, “माझी पत्नी आणि तिच्या आईने आमच्या मुलाचा जबरदस्तीने गर्भपात केला आणि सर्व दागिने तिच्याकडे घेतले. तसेच माझी पत्नी मला धमकी देत ​​होती की मी आमचं घर आणि संपत्ती तिच्या नावावर करावी, अन्यथा ती माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर खोटा खटला दाखल करेल”, असं मोहितने व्हिडीओत म्हटलं. तसेच जर माझ्या मृत्यूनंतरही मला न्याय मिळाला नाही, तर माझी राख नाल्यात टाकून द्या, आई आणि बाबा, कृपया मला माफ करा. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही”, असं म्हणत त्याने आपलं जीवन संपवलं.

दरम्यान, पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की, “आम्हाला रेल्वे स्टेशन रोडवरील एका हॉटेलमध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जाऊन तपासणी केली असता आम्हाला एका खोलीत मोहितचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर आम्ही फॉरेन्सिक तपासणी केली आणि अहवाल तयार केला. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचं दिसून येत आहे. आता या संदर्भात त्याच्या कुटुंबाला कळवण्यात आलं. शवविच्छेदन अहवालानंतर मोहितचा मृतदेह त्याच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आला”, असं पोलिसांनी सांगितलं.

मोहितच्या भावाने या घटनेबाबत सांगितलं की, “माझा भाऊ मोहित नोएडा येथील एका सिमेंट कंपनीत काम करत होता. तिथेच त्याची प्रियाशी ओळख झाली होती. आम्ही त्यांचं लग्न लावून देण्याच्या आधी त्यांचे सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांनंतर प्रियाने त्याचा छळ करायला सुरुवात केली होती. तिने त्याला कुटुंबापासून वेगळे केले आणि खोटे कायदेशीर खटले भरण्याची धमकी देऊन मालमत्ता तिच्या नावावर करण्यासाठी दबाव आणला होता. या दबावाखाली माझ्या भावाने जीवन संपवलं”, असा आरोप मोहितच्या भावाने केला आहे.