Uttar Pradesh Crime : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये काही दिवसांपूर्वी एका मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी व तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या घटनेनंतर आता अशाच प्रकारची दुसरी एक घटना उत्तर प्रदेशात समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या प्रियकराला बरोबर घेऊन पतीच्या हत्येचा कट रचून लग्नाच्या दोन आठवड्यानंतर पतीची हत्या केली आहे. या घटनेनंतर मैनपुरी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रगती नामक तरुणीचे चार वर्षांपासून तिच्या गावातील अनुराग नामक तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. मात्र, असं असतानाही तिच्या कुटुंबाने ५ मार्च रोजी २२ वर्षीय दिलीप यादवशी तिचे लग्न लावून दिलं. त्यामुळे या लग्नावर ती नाराज झाली. यानंतर तिने पतीचा काटा काढण्याचं ठरवलं. प्रगती आणि तिचा प्रियकर अनुराग या दोघांनी दिलीपला संपवण्याचा कट रचला. यासाठी प्रगतीने प्रियकराला सांगितलं की पतीच्या मृत्यूनंतर ते एकत्र जीवन जगू शकतात आणि प्रियकराला १ लाख रुपये दिले. यानंतर अनुरागने दिलीपची हत्या करण्यासाठी दुसऱ्या एका व्यक्तीला दोन लाखांची सुपारी दिली.

यानंतर १९ मार्च रोजी दिलीप हा कन्नौज जिल्ह्यातून घरी परतत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलच्या बाजूला थांबला होता. मात्र, तितक्यात एका दुचाकीवरून दोन व्यक्ती त्याच्याकडे आले आणि मदत करतो म्हणून दुचाकीवर बळजबरीने बसवून एका शेतात नेलं. त्या ठिकाणी दिलीपवर जोरदार हल्ला केला आणि गोळीही झाडली. या घटनेत दिलीप गंभीर जखमी झाला. यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. या घटनेची स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि दिलीपला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तीन दिवसांच्या उपचारानंतर दिलीपचा मृत्यू झाला.

यानंतर पोलिसांनी संपूर्ण घटनेचा तपास सुरु केला आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा या गुन्ह्याचा उलगडा झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिलीपला एका दुचाकीवरून काहीजण घेऊन जात असल्याचं आढळून आलं. यानंतर पोलिसांनी मारेकऱ्यांना शोधलं. यानंतर मारेकऱ्यांची चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबूली दिली. तसेच या हत्येची सुपारी देण्यात आल्याचं कबूल केलं. यानंतर पोलिसांनी आरोपी प्रगतीसह प्रियकरालाही बेड्या ठोकल्या.