Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशातील झाशी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एका २६ वर्षीय तरुणाने सासऱ्याच्या घरात गळफास घेऊन स्वत:चं जीवन संपवलं आहे. बालक राम असं या तरुणाचं नाव आहे. तसेच मृत्यूपूर्वी या तरुणाने एक १५ सेकंदांचा एक व्हिडीओ बनवला होता. यामध्ये बालक रामने आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप करत असल्याचं दिसून आलं आहे.

या घटनेमुळे झाशी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. व्हिडीओमध्ये बालक राम असं म्हणताना ऐकू येत आहे की, “माझी पत्नी सुधाला कोणतेही अधिकार नाहीत. हे लोक मला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. मी माझ्या सासरच्या घरी आहे. आता बघा”, असं म्हणत असल्याचं व्हिडीओ दिसत आहे. दरम्यान, यानंतर त्याने घरात साडीने गळफास घेऊन स्वत:चं जीवन संपवलं. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, बालक राम याचं सुधाशी आठ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना दोन मुली आहेत. बालक रामचे वडील राम प्रकाश यांच्या म्हणण्यानुसार सुधा १५ दिवसांपूर्वी तिच्या माहेरी गेली होती. घटनेच्या दिवशी बालक राम आपल्या कुटुंबाला न सांगता आपल्या पत्नीला परत आणण्यासाठी गेला होता. त्याच्या वडिलांनी आरोप केला आहे की त्याच्या मुलाला धमकावून हे टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

बालक रामचे वडिलांनी आरोप केला की, “माझ्या सुनेला आणण्यासाठी जाताना मला गावप्रमुखाला बरोबर आणण्यास सांगण्यात आलं होतं. कोणताही वाद झाला नव्हता. तरीही हे सांगितलं होतं. मात्र, आता आम्हाला कळवण्यात आलं की माझ्या मुलाने त्याचं जीवन संपवलं आहे.

दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. तसेच बालक रामला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवालाची प्रतिक्षा आहे. पोलीस अधीक्षक गोपीनाथ सोनी यांनी सांगितलं की, “शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबाच्या तक्रारीच्या आधारे कायदेशीर कारवाई केली जाईल.”

Story img Loader