उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री आणि विधानसभेचे कामकाज मंत्री सुरेश खन्ना यांनी बुधवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख ‘राजकारणातील राम’ असा केला आहे. खन्ना हे पुरवणी अर्थसंकल्प मांडत असताना त्यांना विरोधी पक्षाचे नेते राम गोविंद चौधरी यांनी थांबवण्याचा प्रयत्न करत आक्षेप घेतला. त्यावेळी खन्ना यांनी हे वक्तव्य केलं आहे.

खन्ना यांचं वक्तव्य ऐकून चौधरी गोंधळले. तर सत्ताधारी आमदारांनी बाकं वाजवून या वक्तव्याचं समर्थन केलं. दरम्यान यावेळी सभागृहात उपस्थित असणारे योगी आदित्यनाथ हसताना दिसले. खन्ना यांनी योगी सरकारने अनेक विक्रम केल्याचं म्हटलं तेव्हा त्यांना चौधरी यांनी विरोध केला. मात्र हा विरोध सत्ताधारी बाकावरील आमदारांनी गोंधळ घालून उडवून लावला. याच गोंधळादरम्यान खन्ना आपल्या जागेवरुन उठले आणि योगी आदित्यनाथ यांच्याकडे बोट करुन त्यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख राजकारणाचे राम असा केला.

“हे तर राजकारणातील राम आहेत. ते आसूरी शक्तींना पराभूत करण्यासाठी येथे बसले आहेत,” असं खन्ना म्हणाले. यावर चौधरी यांनी उत्तर देताना, “ते राजकीय दृष्ट्या ऋषी नाहीत तर एका आचार्य पिठाचे प्रमुख आहेत,” असं म्हटलं. उत्तर प्रदेशमध्ये पुढील काही महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक असल्याने आताच पुरवणी अर्थसंकल्प मांडण्यात आलाय.

मोदींची करण्यात आलेली भगवान श्री राम आणि भगवान श्री कृष्णाशी तुलना

यापूर्वी उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना भगवान श्री कृष्ण आणि भगवान श्री राम यांच्यांशी केली होती. मार्च महिन्यामध्ये मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर हरिद्वारमध्ये नेत्र कुंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात रावत यांनी, “ज्याप्रमाणे द्वापर युगामध्ये भगवान श्री राम आणि त्रेता युगामध्ये भगवान श्री कृष्णाने आपल्या कर्मांमुळे समाजामध्ये मान सन्मान मिळवला आणि देवत्व प्राप्त केलं त्याच प्रकारे येण्याऱ्या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देवाप्रमाणे पूजा केली जाईल,” असं म्हटलं होतं. मुख्यमंत्री रावत हे हरिद्वारमधील कुंभ मेळ्यासंदर्भातील कार्यक्रमात भाषण देताना मोदींवर स्तुतीसुमनं उधळत होते. एक काळ असा होता की देशाचे पंतप्रधान परदेशात जायचे तेव्हा त्यांना तिकडे कुणी विचारायचही नाही. आज मात्र भारताची परिस्थिती आणि गोष्टींकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा परदेशात जातात तेव्हा इतर देशांचे राष्ट्रध्यक्ष त्यांची भेट घेण्यासाठी रांगेत उभे राहतात, असं रावत म्हणाले होते. तीरथ सिंह रावत यांच्या या वक्तव्यावरुनही मोठा वाद निर्माण झाला होता.

Story img Loader