नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राम मंदिराविषयीची एक बातमी समोर आली आहे. श्रीराम मंदिर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एसटीएफचे एडीजी अमिताभ यश यांना बॉम्बने उडवू असा एक ईमेल आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सहेंद्र कुमार यांनी गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात FIR नोंदवली आहे. देवेंद्र तिवारी यांच्या तक्रारीनंतर FIR नोंदवण्यात आली आहे. भारतीय किसान मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र तिवारी यांनाच हा मेल आला होता.
काय घडली घटना?
भारतीय किसान मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र तिवारी यांना जुबेर खान नावाच्या एका इसमाने इमेल करुन योगी आदित्यनाथ, राम मंदिर हे सगळं बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. जुबेर खानने आपण आयएसआय या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी संबंधित आहोत असंही या मेलमध्ये म्हटलं आहे. देवेंद्र तिवारी यांना २७ डिसेंबर रोजी हा इमेल पाठवण्यात आला. त्यानंतर तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. एटीएस आणि एसटीएफ यांच्याकडूनही इ मेल नेमका कुठून आला याचा शोध घेतला जातो आहे.
देवेंद्र तिवारी यांची एक्स पोस्ट
या संदर्भात देवेंद्र तिवारी यांनी एक्स पोस्टही केली आहे. त्यात ते म्हणतात “आज २७ डिसेंबर २०२३ रोजी मला दुपारी २ वाजून ७ मिनिटांनी एक मेल आला. या मेलमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, एसटीएफचे प्रमुख अमिताभ यश यांना ठार करण्यात येईल असा मजकूर आहे. तसंच राम मंदिर बॉम्बने उडवण्यात येईल अशीही धमकी आहे. जुबेर खान नावाच्या व्यक्तीने मला हा इमेल पाठवला आहे. या प्रकरणी विशेष तपास केला जावा अशी मागणी मी करतो आहे.” अशी पोस्ट तिवारी यांनी लिहिली आहे.
मागच्या वर्षी एप्रिल महिन्यातही योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी ११२ क्रमांक डायल करुन ही धमकी दिली गेली होती. यानंतरही तपास यंत्रणा सतर्क झाल्या होत्या.