उत्तर प्रदेशातील सरकार दहशतवाद्यांच्या पैशाने केक खाते, असे वादग्रस्त विधान करून केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी नव्या वादाला निमंत्रण दिले आहे. यापूर्वीही साध्वी यांनी अशाप्रकारची वादग्रस्त विधाने केली आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या वादग्रस्त विधानांमुळे पक्ष चांगलाच अडचणीत सापडताना दिसत आहे. साध्वी निरंजन ज्योती यांनी या अडचणीत आणखी भर टाकली आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या वाढदिवसाला दहशतवाद्यांच्या पैशाने केक आणला जातो. त्यांच्याच पक्षातील आझम खान यांनी तशी कबुलीही दिल्याचे साध्वी यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी मुलायमसिंह यांच्या जंगी वाढदिवस सोहळ्यासाठी पैसा कुठून आणण्यात आला, असा प्रश्न पत्रकारांनी आझम खान यांना विचारला होता. तेव्हा त्यांनी दाऊद इब्राहिम आणि दहशतवाद्यांनी या वाढदिवसासाठी पैसे दिल्याचे म्हटले होते. आझम खान यांच्या त्याच विधानाचा धागा पकडून साध्वी यांनी समाजवादी पक्षाचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केला. याशिवाय, त्यांनी काँग्रेस पक्षाला लक्ष्य करताना, आमच्याकडे नऊ महिन्यांचा हिशोब मागणाऱ्यांनी प्रथम ६२ वर्षांचा हिशोब द्यावा, असे म्हटले. यावेळी साध्वी यांनी मोदी सरकारवर स्तुतीसुमने उधळताना मोदी सरकारच्या प्रशासनामुळे शेतकरी आनंदित असल्याचे म्हटले. तसेच या सरकारमुळे महागाई कमी झाली असून आगामी पाच वर्षात हे सरकार आपली सर्व वचने पूर्ण करणार असल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा