पीटीआय, प्रयागराज

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभामध्ये आतापर्यंत ६० कोटी भाविकांनी स्नान केल्याचा दावा उत्तर प्रदेश सरकारने शनिवारी केला. कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केल्यास मोक्ष मिळतो अशी अनेक भाविकांची समजूत आहे. मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी, १३ जानेवारीला सुरू झालेला हा महाकुंभ बुधवारी, २६ फेब्रुवारीला समाप्त होणार आहे.

राज्य सरकारने प्रसृत केलेल्या अधिकृत निवेदनात हिंदू धर्माचा उल्लेख सनातन धर्म असा करण्यात आला आहे. त्यामध्ये नमूद केल्यानुसार, भारतातील १.१० अब्ज सनातन धर्मीयांपैकी निम्म्यापेक्षा जास्त भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले आहे. महाशिवरात्रीच्या अमृत स्नानापर्यंत ६५ कोटी सनातनी भाविकांनी स्नान केले असेल. या महाकुंभामध्ये कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक किंवा सामाजिक सोहळ्यामधील सर्वात मोठा सहभाग दिसून आल्याचा दावाही उत्तर प्रदेश सरकारने केला आहे.

वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूच्या आकडेवारीनुसार, सध्या भारताची लोकसंख्या १४३ कोटी असून त्यामध्ये ११० कोटी हिंदू धर्मीय आहेत. प्यू रिसर्चच्या माहितीनुसार जगभरात हिंदू धर्मीयांची संख्या १.२० अब्ज इतकी आहे. उत्तर प्रदेशने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील ५० टक्के हिंदू भाविकांनी आतापर्यंत त्रिवेणी संगमावर स्नान केले आहे. एकट्या नेपाळमधून ५० लाख भाविकांनी स्नान केल्याचे उत्तर प्रदेश सरकारचे म्हणणे आहे. त्याशिवाय जगभरातील ७३ मुत्सद्दी अधिकारी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी त्रिवेणी संगम स्नान केल्याचे राज्य सरकारच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कोट्यवधींची आकडेवारी

● मौनी अमावस्येच्या दिवशी सर्वाधिक आठ कोटी भाविकांचे स्नान

● मकरसंक्रातीला ३.५० कोटी

● पौष पौर्णिमेला १.७ कोटी

● वसंतपंचमीला २.५७ कोटी

● माघ पौर्णिमेला २ कोटी

● १८ फेब्रुवारीपर्यंत ५५ कोटी

● २२ फेब्रुवारीपर्यंत ६० कोटी

● महाशिवरात्रीपर्यंत ६५ कोटी भाविक स्नान करण्याची अपेक्षा

नड्डा यांचेही संगमस्नान

भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी शनिवारी आपल्या कुटुंबासह त्रिवेणी संगमावर स्नान केले अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली. नड्डा यांच्याबरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक, मंत्री स्वतंत्र देव सिंह आणि नंद गोपाल गुप्ता यांनीही संगम स्नान केले. नड्डा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सूर्याची प्रार्थना केली आणि गंगेला साडी, नारळ, फुले व अन्य साहित्य वाहिले.