Greater Noida : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ग्रेटर नोएडामधील एका रुग्णालयात सात वर्षांच्या मुलावर डोळ्याची शस्त्रक्रिया न करताच तब्बल ४५ हजार रुपयाचं बिल आकारल्याचा प्रकार समोर आला आहे. या मुलाचे डोळे दुसऱ्या एका डॉक्टरांनी चेक केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. तसेच या मुलाच्या कुटुंबीयांनी सदर रुग्णालयावर केलेल्या आरोपाची आता चौकशी करण्यात येत आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. मुलाच्या आई आणि वडिलांनी रुग्णालयाबाबत पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर तपासानंतर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र, या संपूर्ण प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान, यासंदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
हेही वाचा : Rajasthan By-Election : अपक्ष उमेदवाराची उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना मारहाण, VIDEO व्हायरल
मुलाच्या वडिलांनी आरोप केला आहे की, “त्यांच्या मुलाच्या डाव्या डोळ्याऐवजी उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, असा त्यांचा आरोप आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा मुलगा १२ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात त्याच्या डाव्या डोळ्यात वारंवार पाणी येत असल्याने तपासणीसाठी गेला होता. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यास सांगितलं.”
“त्यानंतर मी एका आठवड्यापूर्वी माझ्या मुलाला त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तेव्हा तेथील डॉक्टरांनी मला सांगितलं की त्याला ऍलर्जी आहे. त्यानंतर एका आठवड्याने ऑपरेशन करण्यात आलं. त्यासाठी डॉक्टरांनी सांगितलं की, ४५ हजार रुपये खर्च आला असून ऑपरेशन यशस्वी झालं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं की, डोळ्यातून एक धातूसारखी बारीक वस्तू काढून टाकण्यात आली. त्यानंतर आम्ही घरी गेलो. मात्र, घरी आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की, मुलाच्या ज्या डोळ्याच्या ऑपरेशनची गरज होती. त्या डोळ्याचं ऑपरेशन झालं नव्हतं. त्यानंतर ताबडतोब आम्ही दुसऱ्या रूग्णालयात दाखल होत डॉक्टरांचा सल्ला घेतला. तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की, कोणतीही शस्त्रक्रिया झाली नाही. त्यामुळे आमची फसवणूक झाली आहे”, असा आरोप मुलाच्या वडिलांनी केला.