Kannauj Building Collapse : उत्तर प्रदेशातील कन्नौज रेल्वे स्थानकावर शनिवारी बांधकाम सुरू असलेली एक इमारत कोसळली. ज्याखाली अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून २३ कामगारांना वाचवण्यात आले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री आणि कनौजचे आमदार असीम अरुण यांनी दिलेल्या माहितीनुसार २३ कामगारांना ढिगाऱ्याखालून काढण्यात आले आहे. यामध्ये २० कामगारांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर, ३ जण गंभीर जखमी आहेत आणि त्यांना पुढील उपचारासाठी लखनऊला पाठवले आहे.
रेल्वे स्थानकावर सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. हे बांधकाम अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत केले जात होते. इमारत पडताच संपूर्ण परिसरात मोठा आवाज झाला. जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात येत असून, प्रशासनाने अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजूरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे आणि त्यांना योग्य वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत.
“प्राथमिक माहितीनुसार, छताचे बांधकाम सुरू असलेले शटरिंग कोसळल्याने ही घटना घडली. आमची पहिली प्राथमिकता अडकलेल्या कामगारांना वाचवणे आहे. आम्ही बचाव कार्यासाठी आमच्याकडे असलेल्या सर्व संसाधनांचा वापर करत आहोत”, असे जिल्हाधिकारी शुभ्रांत कुमार शुक्ल यांनी सांगितले.
हे ही वाचा : Kanpur Couple Video: रिल बनविण्यासाठी कपलचं बाईकवर अश्लील कृत्य, व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस ॲक्शन मोडवर
प्रत्यक्षदर्शीने काय सांगितले?
कन्नौजमधील बांधकाम सुरू असलेल्या रेल्वे स्थानकावर काम करणारे कामगार महेश कुमार यांनी या अपघाताच्या भयानक दृश्याबद्दल सांगितले. महेश कुमार म्हणाले, ‘आम्ही जेवण करून कामावर गेलो होतो. इमारतीच्या कमानीसाठी तयार साहित्याची पहिली ट्रॉली वर जाताच संपूर्ण बीम खाली कोसळले. माझा एक पाय ट्रॉलीवर आणि दुसरा बीमवर होता, त्यामुळे माझा जीव वाचला. तिथे सुमारे ४०-५० कामगार काम करत होते, ते सर्वजण बीमखाली गाडले गेले.
हे ही वाचा : भाजपाच्या माजी आमदाराच्या घरात आढळल्या मगरी; भ्रष्टाचार प्रकरणात प्राप्तीकर विभागाने धाड टाकताच अधिकारीही चक्रावले
उत्तर प्रदेश सरकारने जखमींना जाहीर केले मदत
या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना राज्य सरकारने ५०,००० रुपये आणि किरकोळ जखमींना ५,००० रुपये भरपाई जाहीर केली आहे. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे, ईशान्य रेल्वेने सांगितले. बचाव कार्यात मदत करण्यासाठी लखनौहून राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ) पाचारण करण्यात आले आहे.