पत्नीने आयब्रोज (भुवया कोरल्याने) केल्याने पती चांगलाच भडकला आणि त्याने थेट व्हिडीओ कॉलवरुन पत्नीला ट्रिपल तलाक दिला आहे. ब्युटी पार्लरमध्ये जाऊन पत्नीने भुवया कोरल्या हे पतीला मुळीच आवडलं नाही. उत्तर प्रदेशातल्या कानपूरमधली ही घटना आहे. या महिलेचा पती सौदीमध्ये राहतो. सलीम असं त्याचं नाव आहे. त्याने त्याची पत्नी गुलसबाला तलाक दिला.
काय घडली घटना?
सलीम हा सौदी अरेबियात वास्तव्यास आहे. त्याने त्याच्या पत्नीला म्हणजेच गुलसबाला व्हिडीओ कॉल केला होता. व्हिडीओ कॉलवर गुलसबाने आयब्रोज केल्याचं सलीमला समजलं. त्यामुळे सलीम रागाने लालबुंद झाला. त्याने व्हिडीओ कॉलवरच तिला ट्रिपल तलाक दिला. पीडित महिलेने या प्रकरणी पती सलीम विरोधात पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानंतर आता पोलिसांना हेदेखील कळलं आहे की गुलसबाला तिच्या सासरचे लोक हुंडा मिळावा म्हणून छळत आहेत.
पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी गुलसबाने दिलेल्या तक्रारीनतर मुस्लिम विवाह कायद्याच्या अंतर्गत हे प्रकरण नोंदवलं आहे. व्हिडीओ कॉलवर हे दोघं बोलत असताना सलीमला लक्षात आलं की गुलसबाने आयब्रोज केले आहेत. त्यावर त्याने तिला विचारलं की तू मला न विचारता थ्रेडिंग का केलं? त्यावर गुलसबा काही बोलली नाही. पण सलीमने रागाच्या भरात तिला तलाक दिला, तसंच तिला म्हणाला की आता तुला काय करायचं ते कर तू स्वतंत्र आहेस. ही घटना ४ ऑक्टोबरला घडल्याचं पोलिसांनी सांगतिलं आहे.