UP Vikas Dubey Snake bite : उत्तर प्रदेशमधून एक चक्रावून टाकणारा प्रसंग घडला आहे. ग्रामीण भागात सर्पदंश होण्याचे प्रकार अधूनमधून घडत असतात. पण फतेहपूरमधील विकास दुबे (२४) या युवकाला मागच्या ४० दिवसांत सात वेळा सर्पदंश झाला आहे. विशेष म्हणजे त्याला प्रत्येक शनिवारी किंवा रविवारी साप चावत आहे. सात वेळा सर्पदंशावरील उपचार करून युवक जेरीस आला असून त्याने आता सरकारकडून आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा केली आहे. फतेहपूरचे जिल्हा शल्यचिकित्सक राजीव नयन गिरी यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना या प्रकरणाची माहिती दिली.
राजीव नयन गिरी म्हणाले की, पीडित विकास दुबे जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन रडत होता. सहा वेळा सर्पदंश झाल्यानंतर त्याने उपचारासाठी बरेच पैसे खर्च केले. मात्र सातव्यांदा सर्पदंश होताच त्याच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत. आम्ही त्याला सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला. तिथे सर्पदंशावरील औषधे मोफत दिली जातात.
तरुणानं सापाचा दोनदा चावा घेतला आणि सापाचा झाला मृत्यू, नेमकं काय घडलं?
प्रकरण काय आहे?
विकास दुबेला २ जून रोजी पहिल्यांदा सर्पदंश झाला होता. सकाळी झोपेतून उठल्यानंतर बेडवरून खाली उतरताच सापाने चावा घेतला. त्यानंतर सलग चार वेळा शनिवारी त्याला सर्पदंश झाला. चौथ्यांदा सर्पदंश झाल्यानंतर गावातील नातेवाईकांनी त्याला इतर गावी जाऊन राहण्याचा सल्ला दिला. त्यानुसार विकास राधानगर याठिकाणी मावशीच्या गावी गेला. पण तिथेही पाचव्यांदा त्याला सर्पदंश झाला.
यानंतर धास्तावलेल्या विकासच्या पालकांनी त्याला पुन्हा आपल्या मूळ गावी आणले. तिथेही ६ जुलै रोजी त्याला पुन्हा साप चावला. यानंतर विकासचे शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण झाले. पालकांनी त्याला रुग्णालयात दाखल करून उपचार करून घेतले.
हे ही वाचा >> हृदयद्रावक! डान्सरनं भरस्टेजवर जिवंत कोंबडीचं डोकं दातानं चावलं अन् रक्त…; धक्कादायक video viral
स्वप्नात सर्पदंशाची माहिती मिळते
विकासने एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, सर्पदंश होणार याचे संकेत त्याला आधीच मिळतात. तसेच त्याला आणखी दोन वेळा सर्पदंश होणार असल्याची प्रचिती स्वप्नात आलेली आहे. नवव्यांदा सर्पदंश झाल्यानंतर त्याचा मृत्यू होणार असल्याचा दावा विकास दुबेने केला आहे. मात्र त्याच्या या दाव्याला वैज्ञानिक आधार नाही. चौकशीनंतरच त्याच्या या दाव्याची सत्यता समोर येऊ शकेल.
चौकशीसाठी समिती स्थापन, घटनेची सत्यता तपासणार
“विकास सागंतोय त्याप्रमाणे त्याला प्रत्येक आठवड्याच्या शेवटी सर्पदंश होतोय का? याचा आम्ही तपास करत आहोत. तसेच त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही मत जाणून घेण्यात येत आहे. एका व्यक्तीला दर शनिवारी साप चावतो, त्यानंतर तो एकाच खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतो आणि एकच दिवसात बरा होऊन बाहेर पडतो, ही परिस्थिती संशयजनक आहे”, असेही डॉ. गिरी म्हणाले. या प्रकरणी आता डॉक्टर आणि इतर लोकांची समिती स्थापन करण्यात आली असून त्यांच्याकडून चौकशी केली जाणार आहे.